दहावीच्या इंग्लिशची प्रश्नपत्रिका ही आता ‘अॅक्टिव्हिटी शिट’ होणार असून धडय़ांवरचे प्रश्न, व्याकरणावर प्रश्न हे आता हद्दपार होणार आहेत. मार्च २०१४ च्या परीक्षेपासून इंग्लिशची परीक्षा भाषेच्या वापरावर आधारित असणार आहे.
दहावीचे अभ्यासक्रम या वर्षीपासून बदलण्यात आले आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाने २०१० मध्ये तयार केलेल्या प्रारूपानुसार नव्या अभ्यासक्रमामध्ये कृतीतून शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार आता इंग्लिश प्रथम भाषा आणि तृतीय भाषेच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे प्रारूपही बदलण्यात आले आहे. किंबहुना त्याला प्रश्नपत्रिका न म्हणता अॅक्टिव्हिटी शिट म्हणावे असा प्रस्ताव अभ्यास मंडळाने दिला आहे. आतापर्यंत इंग्लिशच्या पुस्तकामध्ये धडय़ांवर आधारित प्रश्न, व्याकरणावरचे प्रश्न अशाप्रकारचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होते. मात्र, धडय़ांवरचे प्रश्न हा प्रकारच नव्या प्रश्नपत्रिकेतून हद्दपार झाला आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना भाषेचा वापर कशा प्रकारे करता येतो, भाषेचे आकलन किती आहे, या अनुषंगाने प्रश्न असणार आहेत.
इंग्लिश तृतीय भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न हा नेहमीप्रमाणेच उताऱ्यावरील प्रश्नांचा आहे. मात्र, उताऱ्यावरील वस्तुस्थितीजन्य प्रश्नांऐवजी विद्यार्थ्यांच्या मतांवर आणि उताऱ्याच्या माध्यमातून त्याला कळलेल्या विषयाबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. दुसऱ्या प्रश्नातही उताऱ्याप्रमाणे कवितांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. लेखन कौशल्यावर या प्रश्नपत्रिकेत अधिक भर आहे. मात्र, त्यामध्येही मुद्दय़ांवरून पत्र किंवा निबंध लिहिणे या ऐवजी जाहिरात वाचून त्या अनुषंगाने स्वत:चे मत मांडणारे पत्र लिहिणे, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करून त्यावरून संवाद लेखन करणे, एखाद्या ‘पाय डायग्राम’ वरून परिस्थितीचा अहवाल तयार करणे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. प्रश्नपत्रिकेची आकर्षक मांडणी हे या परीक्षेचे अजून एक वैशिष्टय़ आहे. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेती रूक्ष स्वरूपाला या नव्या पद्धतीमध्ये अजिबातच जागा नाही. भरपूर आकृत्यांचा, वेळप्रसंगी चित्रांचा वापर करून प्रश्नपत्रिका आकर्षक बनवण्यात आली आहे.
याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इंग्लिश विषयाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य उमेश प्रधान यांनी सांगितले, ‘‘विद्यार्थ्यांना भाषेचा वापर करता येतो का, याची चाचणी या परीक्षेतून होणार आहे.२२ प्रकारच्या कृतींमधून भाषेचे आकलन झाले आहे का, हे पाहता येऊ शकते. प्रश्नपत्रिकेचे प्रारूप मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दहावीच्या इंग्रजी परीक्षेला आता ‘अॅक्टिव्हिटी शिट’
दहावीच्या इंग्लिशची प्रश्नपत्रिका ही आता ‘अॅक्टिव्हिटी शिट’ होणार असून धडय़ांवरचे प्रश्न, व्याकरणावर प्रश्न हे आता हद्दपार होणार आहेत.
First published on: 07-09-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activity seat in hsc english examination