‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेबरोबरच या वर्षीपासून देशभरातील एनआयटी, आयआयआयटी आणि इतर केंद्रीय तंत्रशिक्षण संस्था मिळून तब्बल ८८ संस्थांचे प्रवेश एकत्रितपणे करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत आयआयटीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर एनआयटी, आयआयआयटी आणि इतर केंद्रीय तंत्रशिक्षण संस्थांचे प्रवेश केले जात होते. या सर्व संस्थांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांची पहिली पसंती आयआयटीला असते. गेली अनेक वर्षे ही पद्धत राबविली जात होती. परंतु, आता आयआयटी आणि या संस्थांचे प्रवेश एकत्रितपणे केले जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर संपविण्याच्या आणि त्यात सुसूसत्रता आणण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. तसेच तो विद्यार्थ्यांच्याही सोयीचा आहे. म्हणजे या सर्व संस्थांकरिता विद्यार्थ्यांकडून एकाच वेळी पसंतीक्रम भरून घेतले जातील आणि जागांचे वाटप एकाच वेळी जाहीर केले जाईल.
मुंबईच्या आयआयटीमध्ये या सर्व संस्थांची मिळून नुकतीच एक बैठक झाली. ‘दि जॉईंट सीट अलोकेशन अ‍ॅथॉरिटी’च्या या बैठकीत सर्व संस्थांनी या संबंधातील करारावर सही केली. सर्व आयआयटींच्या प्रवेशांकरिता स्थापलेले ‘जॉइंट अ‍ॅडमिशन बोर्ड’ (जेएबी), आयआयटीच्या जेईई-अ‍ॅडव्हान्स, २०१५ चे आयोजक आणि आयएसएम (धनबाद) आणि एनआयटी आणि आयआयआयटीच्या प्रवेशांची जबाबदारी सांभाळणारे ‘सेंट्रल सीट अ‍ॅलोकेशन बोर्ड’ (सीएमएबी) यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
ही एकत्रित प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची यावर यावेळी चर्चा झाली. याची माहिती http://jeeadv.iitb.ac.in/  या संकेतस्थळावर मिळेल. यानुसार २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांचे प्रवेश ‘दि जॉइंट सीट अलोकेशन अ‍ॅथॉरिटी’च्या मार्फत केले जाणार आहेत. प्रवेशासाठीचे संयुक्त संकेतस्थळ २५ जूनपासून सुरू होईल.

Story img Loader