तंत्रशिक्षण संचालनालयाकडून नोटीस; त्रुटींच्या पूर्ततेचा अभाव
राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याशी संबंधित जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) निकष धाब्यावर बसवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महाविद्यालयाकडून केवळ एआयसीटीईचीच फसवणूक झालेली नसून, विद्यार्थी-पालक तसचे शासन व संबंधित विद्यापीठाचीही फसवणूक झाली असल्याने महाविद्यालयावर कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने बजावली आहे. गंभीर बाब म्हणजे नोटीस बजावताना तीन महिन्यांत त्रुटींची पूर्तता करण्यास सांगूनही कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही.
राज्यातील अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून बहुतेक महाविद्यालयांत वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, वसतिगृहे, वाचनालय नसल्याचे दिसून आले आहे. एकाच महाविद्यालयाच्या आवारात अनेक अभ्यासक्रम नियमबाह्य़ पद्धतीने चालवणे तसेच चांगल्या सोयीसुविधाही न देण्याच्या मानसिकतेमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले आहेत. या आदेशानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने ऑक्टोबर २०१५ मध्ये राज्यातील सर्व अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी केली. यामध्ये मोठय़ा प्रमाणात महाविद्यालयांनी एआयसीटीईची, विद्यार्थी व शासनाची आणि संबधित विद्यापीठांची फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. या सर्व महाविद्यालयांना कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती.
राजेश टोपे यांच्याशी संबंधित जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालयात एकाच वेळी पदवी व पदविका अभ्यासक्रम चालविण्यात येत असल्याचे दिसून आले. एआयसीटीईकडून दोन पाळ्यांसाठी रवानगी घेऊन एकाच पाळीत अभ्यासक्रम चालवून विद्यार्थ्यांची, एआयसीटीई तसेच शासनाची फसवणूक आणि शिक्षकांची पिळवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय एवढे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी लागणाऱ्या अध्यापक-प्राध्यापकांची कमतरता असतानाही अभ्यासक्रम चालविले जात असल्याचे ‘डीटीई’च्या चौकशीत दिसून आले आहे. याबाबत राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

फौजदारी कारवाईची शक्यता
गंभीर बाब म्हणजे ‘एआयसीटीई’कडे संलग्नतेसाठी ऑनलाइन अर्ज करताना संस्थेत कोणतीही त्रुटी नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे नमूद केले होते. प्रत्यक्षात डीटीईच्या चौकशीत यानंतर त्रुटी असल्याचे आढळून आले असून या फसवणुकीसाठी संबंधित संस्थाचालक तसेच प्राचार्यावर फौजदारी कायदा कलम ४२० खाली गुन्हा दाखल होऊ शकतो, असे संचालनालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader