केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.) परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अनुमती दर्शविली आहे. नव्या संरचनेनुसार आता वैकल्पिक विषयांऐवजी सामान्य ज्ञान विषयाला अधिक भारांकन देण्यात येणार आहे.
वर्षांतून एकदा घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय सेवा परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात यावेत, अशी शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाने नेमलेल्या प्रा. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे करण्यात आली होती. या शिफारशींवर केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागातर्फे  विचार करण्यात आला.
  आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान-१ व २ या विषयांना प्रत्येकी ३०० गुणांचे भारांकन होते. मात्र नवीन बदलांनुसार आता सामान्य ज्ञान विषयाला असलेले भारांकन वाढविण्यात येणार आहे. या प्रस्तावित बदलास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अनुमती दिली असून नव्या परीक्षा पद्धतीची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येईल, असे केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव पी. के. मिश्रा यांनी स्पष्ट केले.
अधिसूचनेमध्ये बदलांबाबत तपशीलवार माहिती देण्यात येईल. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा या अखिल भारतीय सेवांसह सुमारे २८ अन्य सेवांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या परीक्षेचा पहिला टप्पा सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो.
सन २०१३ मध्ये होणाऱ्या परीक्षेची अधिसूचना २ फेब्रुवारीपर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे ती जारी होऊ शकली नव्हती. परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले.
परीक्षा पद्धतीबाबत..
*  मुख्य परीक्षेत सामान्य ज्ञानाच्या भारांकनात वाढ
*  मुख्य परीक्षेच्या प्रारुपात बदल
*  नव्या बदलांना अनुसरुन परीक्षेची अधिसूचना लवकरच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा