प्राध्यापकांच्या संपामुळे मे महिन्यापर्यंत लांबलेल्या प्रथम व द्वितीय पदवी परीक्षा अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांशी ‘क्लॅश’ होऊ लागल्याने विद्यार्थी कात्रीत सापडले आहेत.
याचा मोठा फटका उल्हासनगरच्या ‘चांदीबाई हिम्मतलाल मनसुखानी महाविद्यालया’च्या (सीएचएम) वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षांच्या (एसवायबीकॉम) विद्यार्थ्यांना बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ४ मार्चला सुरू होणार होती. पण, प्राध्यापकांच्या परीक्षा कामावरील बहिष्कारामुळे ती दोन महिने लांबली. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामात सहभागी होण्याचे ठरविल्याने आता ४ ते १० मे रोजी परीक्षा घेण्याचे महाविद्यालयाने ठरविले आहे. मात्र, सुधारित वेळापत्रक ‘इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स’ (आयपीसीसी) या ‘सीए’साठीच्या प्रवेश परीक्षेशी क्लॅश होणारे आहे.
आयपीसीसी ही परीक्षा नेमकी ३ ते १५ मे दरम्यान होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे काही पेपर एका दिवशी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळी ९ ते ११ दरम्यान परीक्षा घेण्याचे महाविद्यालयाने मान्य केले आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, एसवायबीकॉमची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच म्हणजे दुपारी दीडच्या सुमारास आयपीसीसीसाठी परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे.
‘विद्यार्थ्यांना आयपीसीसी देता यावी यासाठी मुद्दाम ती मे महिन्यात आयोजित केली जाते. पण, आमची महाविद्यालयाची परीक्षाच प्राध्यापकांच्या संपामुळे मे महिन्यात आल्याने आम्ही कात्रीत सापडलो आहोत. कारण, आमच्या दृष्टीने या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या आहेत,’ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने दिली. परंतु, आधीच आमच्या परीक्षा फार लांबल्या आहेत.
याहून अधिक परीक्षा लांबणीवर टाकता येणार नाही, अशा शब्दांत महाविद्यालयाच्या प्राचार्य भावना मोटवानी यांनी वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावली. किमान जे दोन पेपर आयपीसीसी परीक्षेच्या दिवशी आले आहेत ते तरी पुढे ढकलण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या मागणीचा आम्ही नक्कीच विचार करू, असे मोटवानी यांनी स्पष्ट केले.
सीएचएममध्ये एसवायबीकॉमचे सुमारे एक हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४० ते ४५ टक्के विद्यार्थी तरी आयपीसीसीच्या परीक्षेला बसणार आहेत. दोन्ही परीक्षांच्या वेळा वेगवेगळ्या असल्या तरी एका परीक्षा केंद्रावरून दुसरी केंद्र गाठणे जिकरीचे बनणार आहे. शिवाय दोन्ही परीक्षांची उजळणी हा देखील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
परीक्षा पुढे ढकलल्या
सीएच्या परीक्षेशी एमकॉम (भाग२) ची परीक्षा क्लॅश होत असल्याने मुंबई विद्यापीठाने आपली २ मे रोजीची परीक्षा ५ मेपर्यंत पुढे ढकलली आहे. सुधारित तारखेला आधी जाहीर केलेल्या वेळेनुसार व केंद्रावर होईल. त्याचबरोबर १८ मे रोजी एमपीएससीमुळे क्लॅश होणाऱ्या विद्यापीठाच्या तीन ते चार विषयांच्या परीक्षाही विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता पुढे ढकलण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा