गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल एक आठवडा लवकर लागल्याने महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया लवकर संपणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाची पायरी चढण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना ती संधी एक आठवडा लवकर मिळणार आहे.
यंदा शनिवार, ८ जूनपासून १५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत आहे. या अर्जामध्ये विद्यार्थी १७ जूनपर्यंत काही दुरुस्ती किंवा बदल करू शकतात. त्यानंतर २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली यादी जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना २४ ते २६ जून यादरम्यान १० ते ३ या वेळेत फी भरून आपला प्रवेश निश्चित करता येईल.
अकरावी प्रवेशाची दुसरी यादी ३० जून रोजी जाहीर होईल. १ व २ जुलै रोजी या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. तर तिसरी आणि शेवटची यादी ५ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया ६ ते ८ जुलैदरम्यान होईल. सर्व यादीतील प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर लगेचच अकरावीचे वर्ग सुरू केले जातील. गेल्या वर्षी प्रवेशप्रक्रिया १२ जुलै रोजी संपली होती.
दोन वर्षांपूर्वी अकरावीचे वर्ग सुरू करण्यासाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा उजाडला होता. त्यामुळे शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कमी अवधी मिळाला होता. मात्र गेल्या वर्षीपासून ऑनलाइन प्रवेशातील त्रुटी दूर केल्याने हा कालावधी कमी झाला आहे. महाविद्यालये लवकर सुरू झाली, तर शिक्षकांना अभ्यासक्रम संपवण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो. त्याचप्रमाणे अकरावी आणि बारावी या दोन्ही इयत्तांचे वर्ग साधारणपणे एकाच वेळी सुरू होतात. याचा फायदा दोन्ही इयत्तांतील विद्यार्थ्यांना होतो. तसेच विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षांत जास्तीतजास्त उपक्रमांमध्ये सहभागी होता येते, असे म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्या माधवी पेठे यांनी सांगितले.

मराठीपेक्षा इंग्रजी माध्यम आघाडीवर
राज्यमंडळाकडून दर वर्षी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराथी, कन्नड, सिंधी आणि तेलगू अशा आठ माध्यमांमध्ये दहावीची परीक्षा घेतली जाते. मराठी माध्यमामधून परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त असली, तरी निकालामध्ये मात्र इंग्रजी माध्यमाची आघाडी दिसून येत आहे. मराठी माध्यमामधून १३ लाख ६० हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७४.६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी माध्यमातून २ लाख ७० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९०.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू माध्यमाचा निकाल ७३.०३ टक्के, हिंदी माध्यमाचा निकाल ६९.९३ टक्के, गुजराथी माध्यमाचा निकाल ८१.७७ टक्के, कन्नड माध्यमाचा निकाल ७४.७७ टक्के, सिंधी माध्यमाचा निकाल ७७.२९ टक्के आणि तेलगू माध्यमाचा निकाल ६६.९२ टक्के लागला आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक
प्रवेश अर्ज सादर करणे – ८ ते १५ जून
अर्जातील त्रुटी ऑनलाईन दुरूस्त करणे – १७ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी – २२ जून (सायंकाळी ५)
पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश – २४ ते २६ जून (सकाळी १० ते दुपारी ३)
दुसरी गुणवत्ता यादी – ३० जून (सायंकाळी ५)
दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश – १ आणि २ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३)तिसरी आणि शेवटची गुणवत्ता यादी – ५ जुलै (सायंकाळी ५)
तिसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश – ६ आणि ८ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३)

पुनर्मूल्यांकनाची सुविधा
यावर्षीपासून पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनामध्ये सर्व उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात येते. विद्यार्थ्यांनी प्रथम छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क आहे. छायाप्रत देताना गुणपडताळणी म्हणजेच सर्व गुणांची बेरीज बरोबर आहे, याची खातरजमा करून छायाप्रत देण्यात येईल. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यावर त्यावर शिक्षकांचे मत घेऊन गुण वाढतील असे वाटल्यास पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांमध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त तीन विषयांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रत्येक विषयासाठी ३०० रुपये शुल्क आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त गुणपडताळणी करायची आहे, त्यांनी छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. फक्त गुणपडताळणीसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. छायाप्रतीसाठी ऑनलाईन गुणपत्रकाच्या प्रिंटआऊटच्या आधारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

लातूर, कोल्हापूर विभागात कॉपीबहाद्दर वाढले
गेली काही वर्षे परीक्षेच्या काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाशी लढा’ अभियान राबवण्यात येते. यावर्षी लातूर आणि कोल्हापूर विभागामध्ये मात्र हे अभियान अयशस्वी ठरले आहे. लातूर विभागामध्ये यावर्षी २४५ गैरप्रकार पकडण्यात आले आहेत. गेल्यावर्षी ही संख्या १४ होती. कोल्हापूर विभागामध्येही गैरमार्गाच्या प्रकारामध्ये वाढ झाली असून यावर्षी ८५ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले, तर गेल्या वर्षी या विभागामध्ये २८ गैरप्रकार पकडण्यात आले. नागपूर विभागाने सर्वाधिक गैरप्रकारांची परंपरा यावर्षीही कायम राखली असून या विभागामध्ये ५२४ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. राज्यात एकूण १ हजार ६४९ गैरप्रकार उघडकीस आले आहेत

शून्य टक्के  निकाल लागलेल्या शाळा कोकणात सर्वाधिक
राज्यातील ८१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. राज्यात सर्वोत्तम ठरलेल्या कोकण विभागामध्येच शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या अधिक आहे. कोकण विभागातील २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. राज्यात २ हजार ७०९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा मुंबई विभागामध्ये मध्ये सर्वाधिक ६८३ आहेत.

गणिताची स्थिती जैसे थे..
राज्याच्या एकूण निकालामध्ये वाढ झालेली दिसत असली, तरी गणिताच्या निकालाची परिस्थिती मात्र फारशी बदललेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जेमतेम १ टक्क्य़ाने वाढ झाली आहे. यावर्षी गणिताचा निकाल ७७.४७ टक्के लागला आहे. गेली काही वर्षे गणिताच्या १५० गुणांपैकी ३० गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीही गणिताच्या निकालामध्ये फारशी सुधारणा झालेली दिसत नाही.

चांदा ते बांदा
राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा निकाल ९५.३९ टक्के लागला असून या जिल्ह्य़ातून १३ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राज्यात सर्वात कमी निकाल भंडारा जिल्ह्य़ाचा  ४४.०६ टक्के  लागला आहे.

पुढच्या वर्षीची (२०१४ )परीक्षा कशी असेल?
* भाषा आणि सामाजिक शास्त्रांचा नवा अभ्यासक्रम असेल.
* गणित आणि सामान्य गणित या विषयांची १५० ऐवजी १०० गुणांची परीक्षा होणार
* इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) विषयाचा अभ्यासक्रमात समावेश. या विषयाची ५० गुणांची परीक्षा होणार असून या विषयाला श्रेणी देण्यात येणार आहे.
* पर्यावरण शास्त्र विषयाचा इतर विषयांमध्ये समावेश करण्यात येणार. त्यामुळे या विषयाची स्वतंत्र परीक्षा होणार नाही.
* इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी प्रथम भाषेबरोबरच मराठी द्वितीय भाषा म्हणून घेण्याएवजी प्रथम भाषा म्हणून घेण्याचा पर्याय उपलब्ध होणार. त्याचप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही मराठी प्रथम भाषेबरोबरच इंग्रजी द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून घेण्याऐवजी प्रथम भाषा म्हणून घेता येणार.
* पुढच्या वर्षीच्या परीक्षेचे वेळापत्रक १ जुलैला जाहीर होणार

Story img Loader