महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार उत्सुक असून यातून युवा नेतृत्व घडविले जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी सांगितले. महाविद्यालयीन निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
राज्यात पूर्वी महाविद्यालयीन निवडणुका व्हायच्या. मात्र ९०च्यादरम्यान त्यामध्ये झालेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्या बंद करण्यात आल्या. पण काही नकारात्मक गोष्टींमुळे एखादी प्रक्रिया पूर्णत: थांबवू शकत नाही. माझा प्रवास विद्यार्थी प्रतिनिधीपासूनच सुरू झाला आहे, असे तावडे यांनी विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नमूद केले. ते याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयीन निवडणुकांची प्रक्रिया बदलणार असून नव्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना त्यांचे मोबाइल क्रमांक द्यायचे, त्यावर त्यांना उमेदवारांचे सांकेतिक क्रमांक पाठविले जातील. यानंतर एसएमएसच्या साह्य़ाने विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या उमेदवाराचा सांकेतिक क्रमांक कळवायचा. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही, असे विद्यार्थी घरून पत्राद्वारे आपले मत नोंदवू शकतात.  ही प्रक्रिया किचकट वाटली तरी निवडणुकांपासून पळ काढण्यापेक्षा त्याचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी सध्याच्या विद्यापीठ कायद्यात सुधारणा कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर अभ्यासक्रमात बदल करू नये तसेच शैक्षणिक वर्षांचे नियोजन वर्षांच्या सुरुवातीलाच करावे अशी सूचना एका विद्यार्थ्यांने केल्यावर तावडे यांनी पुढील शैक्षणिक वर्षांपासून हे बदल केले जातील, असे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा