दादरच्या कीर्ती महाविद्यालयात ‘माहिती-तंत्रज्ञान’ विषयाच्या ‘मास्टर ऑफ सायन्स’च्या (एमएस्सी) विद्यार्थ्यांना ‘आयटी’ ऐवजी ‘संगणक विज्ञान’ विषयाची प्रश्नपत्रिका दिली गेल्याने चांगलाच गोंधळ उडाला.
पेपरविषयी शंका आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर इतर केंद्रांवरील आपल्या मित्रमैत्रिणींशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण भलताच पेपर सोडविल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी या संबंधात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार केली आहे. आता विद्यार्थ्यांना दिलेल्या याच परीक्षेच्या आधारे निकाल लावायचा की फेरपरीक्षा घेऊन हा घोळ निस्तरायचा हा प्रश्न विद्यापीठाला पडला आहे.
एमएस्सीच्या आयटी विषयाच्या जवळपास १३० विद्यार्थ्यांना कीर्ती महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आले आहे. शुक्रवारी या विद्यार्थ्यांना ‘जावा टेक्नॉलॉजी’चा पेपर होता. सकाळी ११ वाजता प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर हे विद्यार्थी चांगलेच चक्रावून गेले. कारण, ६० गुणांसाठीच्या या प्रश्नपत्रिकेत फारच थोडे प्रश्न आम्हाला सोडविता आले, एका विद्यार्थिनीने सांगितले.‘आपण वर्षभर ज्या विषयाचा अभ्यास केला त्याच्याशी पूर्णपणे भिन्न असे त्या प्रश्नांचे स्वरूप होते. परीक्षा संपल्यानंतर पेपर फारच कठीण होता अशी प्रतिक्रिया केंद्रावरील प्रत्येक जण व्यक्त करू लागला. म्हणून आम्ही आमच्या इतर केंद्रांवरील मित्रमंडळीशी प्रश्नपत्रिकेबाबत चर्चा केली. त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला भलत्याच विषयाची प्रश्नपत्रिका दिली गेल्याचे लक्षात आले,’ अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली. ‘आम्ही लिहिलेल्या उत्तरपत्रिकेच्या आधारे निकाल लावला तर आम्ही सगळेच जण नापास होऊ. त्यामुळे आमची फेरपरीक्षा घेण्यात यावी,’ अशी मागणी या विद्यार्थ्यांने केली. ‘विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून आम्ही संबंधित महाविद्यालयातून अहवाल मागविला आहे. हा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल,’ असे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी सांगितले.

Story img Loader