राज्यभरात आज, सोमवारपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत असून प्रवेशपत्रांसंदर्भात झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाने ज्या विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्रे नसतील अशा विद्यार्थ्यां नाही परीक्षेला बसू देण्याची तजवीज केली आहे. दरम्यान, आजपासून सुरू होत असलेल्या परीक्षेला राज्यभरातून जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमांचे मिळून १७ लाख २८ हजार ३६८ विद्यार्थी बसत आहेत. प्रवेशपत्रातील चुकांमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला परीक्षा देण्यासाठी अडचण येणार नाही, अशी हमी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी या वर्षी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार १५ लाख ५८,६३९ विद्यार्थ्यांनी, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार १ लाख ६९ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात ९ लाख ६७,७२९ विद्यार्थी तर ७ लाख ६०, ६५४ विद्यार्थिनी आहेत. या वर्षी १२,९८२ अपंग विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्यात ४८०२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी मंडळाने राबवलेल्या गैरमार्गाशी लढा अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ासाठी सात या प्रमाणे २४५ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांला कोणत्याही कारणास्तव नियोजित परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्यास, त्याला जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे.
प्रवेशपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनी हे करावे..
*शाळेनजीकच्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर जावे. तेथे हमीपत्र घेऊन परीक्षेला बसण्याची मुभा
*केंद्रप्रमुख विद्यार्थ्यांच्या शाळेकडून सविस्तर माहिती मागवतील. विद्यार्थ्यांची ओळख पटल्यावर केंद्रप्रमुख मंडळाला दूरध्वनी करतील.
*मंडळाकडून त्यांना विद्यार्थ्यांचा आसन क्रमांक मिळेल,  हा क्रमांक विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेवर लिहावा. विद्यार्थ्यांच्या शाळा मुख्याध्यापकांना क्रमांक कळवला जाईल
*मुख्याध्यापकांच्या सही-शिक्क्यानिशी तात्पुरते प्रवेशपत्र तयार केले जाईल. तात्पुरते प्रवेशपत्र केंद्रावर पाठवले जाईल
सर्वसहमतीने निर्णय
प्रवेशपत्रांतील अडचणींच्या संदर्भात रविवारी मुंबई विभागीय मंडळातील पदाधिकारी आणि मुख्याध्यापक महासंघाचे पदाधिकारी यांची अडीच तासांची बैठक झाली. त्यात हा सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रवेशपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात शाळांना सहकार्य करण्यासाठी मंडळाने एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. प्रवेशपत्रांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केवळ मुख्याध्यापकांशीच संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक महासंघाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा