विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी एकच व्यावसायिक अभ्यासक्रम वेगवेगळ्या नावाने चालवणाऱ्या व वेगवेगळ्या पदव्या तयार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना आता चाप बसण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा सुधारण्यासाठी असे अभ्यासक्रम व पदव्या बंद करून एका शाखेचा एकच प्रमाण अभ्यासक्रम तयार करण्याची शिफारस व्यावसायिक अभ्यासक्रमातील रिक्त जागांसंबंधी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या यादव समितीने केली आहे. यादव समितीचा अहवाल नुकताच शासनाला सादर करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, व्यवस्थापन अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक जागा राज्यात रिक्त राहात आहेत. त्या पाश्र्वभूमीवर रिक्त जागांचा अभ्यास करण्यासाठी आणि एकूणच तंत्रशिक्षणाच्या दर्जाच्या अभ्यासासाठी मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने त्यांचा अहवाल नुकताच शासनाला सादर केला आहे. एकच अभ्यासक्रम विविध नावाने न चालवता प्रमाण अभ्यासक्रम तयार करून त्यानुसारच पदवी देण्यात यावी अशी शिफारस या समितीने केली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एकाच अभ्यासक्रमाच्या विविध नावांना मंजुरी दिली आहे. त्याशिवाय अनेक शिक्षणसंस्थाही अभ्यासक्रमाचे वेगळे नाव तयार करून त्यानुसार पदव्या देत आहेत. अभियांत्रिकी शाखेमध्ये फक्त इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयाच्या अभ्यासक्रमाची वेगवेगळी ४२ नावे आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या २३४ पदव्या आणि ३९९ पदविका दिल्या जातात. व्यवस्थापन अभ्यासक्रमातही एमबीएच्या जोडीने अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम सध्या राज्यात चालवले जात आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांचा फायदा नफेखोर शिक्षणसंस्थांना होत असून त्याचा परिणाम तंत्रशिक्षणाच्या दर्जावर होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अहवाल म्हणतो..
राज्यात तंत्रशिक्षण देणाऱ्या अनेक दर्जाहिन संस्था, अनेक अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे एकच अभ्यासक्रम अनेक नावाने चालवला जात असल्याचे दिसत आहे. त्याचा शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदविका अभ्यासक्रम करणाऱ्यांना थेट पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यावरही या अहवालात ताशेरे ओढले आहेत.
समितीच्या शिफारसी
*नव्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना अथवा प्रवेश क्षमता वाढवण्यास परवानगी नको
*पीजीडीएम अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता कमी करा वा महाविद्यालये बंद करा
*हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता कमी करावी
*वसतिगृहे सक्षम करावीत. किमान
५० टक्के कर्मचारी आणि शिक्षकांना निवासस्थाने द्यावीत
अभ्यासक्रम
एक, नावे अनेक
इलेक्ट्रॉनिक्स इंजि., इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजि. (हे अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्स इंजि. या नावाने चालवण्याची शिफारस) कॉम्प्युटर इंजि., कॉम्प्युटर सायन्स अँड इंजि., कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (या अभ्यासक्रमांसाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजि. नावाची शिफारस)

Story img Loader