अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक येत्या २५ मे रोजी पुण्यात होणार असून या बैठकीत महामंडळाला सादर केलेल्या बनावट पत्राचे तसेच या अनुषंगाने एकूणच महामंडळाच्या कार्यपद्धतीचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महामंडळाचे कार्यालय महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे गेल्यानंतर पहिल्यांदाच महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. एखादे महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या ‘बनवाबनवीचे’ पडसाद या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.
महामंडळाचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र सादर केल्याप्रकरणी त्याचा राजीनामा घेण्यात आला आहे. ते प्रमुख कार्यवाह या पदावर काम करत होते. मात्र हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून केवळ राजीनामा घेऊन हा प्रश्न संपणार नाही. अशा प्रवृत्तीना कठोर शासन झाले पाहिजे, असा एक मतप्रवाह साहित्य महामंडळात आहे. कारण ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये’ असे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे २५ मे रोजी होणाऱ्या बैठकीत हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र मंडळ, लंडन यांच्याकडून विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आलेले निमंत्रण साहित्य महामंडळाने स्वीकारले असून त्याबाबत संमेलनाच्या मार्गदर्शन समितीची बैठकही नुकतीच पार पडली. विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाच्या घटनेत केलेल्या दुरुस्तीला धर्मादाय आयुक्तांची अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच याबाबतची रीतसर प्रक्रियाही (सूचक व अनुमोदकासह केलेला ठराव) अपूर्ण आहे. तसेच या विषयावरून राज्य शासनाने साहित्य महामंडळाला पाठविलेल्या पत्रात ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून २५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर विश्व मराठी संमेलन भरविण्याची काही गरज आहे का, ते रद्द केले तर काय होईल, असाही मतप्रवाह साहित्य महामंडळात आहे. हा विषयही बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.
दरम्यान या संदर्भात महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता, बैठकीतील विषय अद्याप ठरलेले नाहीत. तसेच ‘बनावट पत्रा’चा विषय आमच्यापुरता संपला आहे, असे सांगून अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Story img Loader