विद्यार्थ्यांमधील उत्साहामुळे नव्या स्पर्धेची घोषणा
विद्यार्थ्यांना शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविता याव्यात यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने ”इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी” (आयआयटी) या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थेने आयोजिलेल्या ”ई-यंत्र” या रोबोटीक्स स्पर्धेला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यावेळी संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरिता या स्पर्धेला जोडून आयोजकांना आणखी एक स्पर्धा जाहीर करावी लागली आहे.
प्रयोगशाळा व मार्गदर्शक यांची वानवा असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ”आयसीटी” योजनेअंतर्गत ”केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागा”ने आयआयटीच्या मदतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. १२ जुलैला ई-यंत्र रोबोटिक्स स्पर्धेच्या नोंदणीचा कालावधी संपला तेव्हा देशभरातील २०० हून अधिक महाविद्यालयातील पाच हजार ७७१ विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या अर्जापैकी ४८० विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीसाठी करण्यात आली. कमाल चार सदस्य असलेल्या १२० गटांमध्ये आता ही स्पर्धा होईल. या गटांना रोबोट प्लॅटफॉर्मवर दिलेल्या संसाधनांचा वापर करून १२ आठवडय़ांच्या कालावधीत दिलेला प्रश्न सोडवायचा आहे. प्रत्येक गट स्पर्धेकरिता असलेल्या ”पॉटहोल फिलर”, ”लाईन-फॉलोअर”, ”रूम क्लिनर” आणि ”पिक-प्लेसर” या चार विषयांमधून एकाची निवड करेल. प्रत्येक विषयातून निवडलेले तीन गट जानेवारी, २०१३मध्ये घेतल्या जाणाऱ्या ”ई-यंत्र” स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेकरिता पवईच्या आयआयटीत येतील. या शिवाय ई-यंत्र स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता ”ई-यंत्र संकल्पना” ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठीची नोंदणी १० सप्टेंबरपासून सुरू होईल.
”देशभरातील विद्यार्थ्यांमधील प्रयोगशील संकल्पनांचा शोध घेणे आणि एंबेडेड सिस्टीम्समधील तत्त्वे शिकणे व त्यांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे ही या स्पर्धाची उद्दिष्टय़े आहेत. त्यातून शेती, उत्पादन, संरक्षण, गृह, शहर नियोजन, सेवा उद्योग अशा क्षेत्रांसाठी उपयुक्ततापूर्ण आणि स्वस्त अशी रोबोटिक्स अॅप्लिकेशन बनविता येतील. दैनंदिन आयुष्यात रोबोटीक्सचा उत्कृष्ट मेळ घालून भारताच्या वाढीस आणि उत्पादन क्षमतेस हातभार लावण्यासाठी कल्पना व अॅप्लिकेशन यांसाठी समृद्ध वातावरण तयार करणे हे आमचे उद्दीष्ट आहे,” असे या स्पर्धेमागील कल्पना स्पष्ट करताना आयआयटीचे ”संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी” विभागाचे प्राध्यापक कृती रामाम्रितम यांनी सांगितले.
”भारतासारख्या जलदगतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत प्रशिक्षित लोकांना प्रचंड संधी आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणातील कार्ये स्वयंचलित करण्यासाठी नवनव्या कल्पना शोधून काढण्याची संधी मिळेल,” असा विश्वास प्रा. कवी आर्या यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेतील पहिल्या २०० विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसे दिली जातील. शिवाय प्रथम २० विद्यार्थ्यांना (प्रवेशिका) त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आयआयटीकडून मार्गदर्शन मिळेल.
नोंदणीसाठी संपर्क – http://www.e-yantra.org
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2012 रोजी प्रकाशित
”आयआयटी”च्या ”ई-यंत्र” राबोटीक्स स्पर्धेला उदंड प्रतिसाद
विद्यार्थ्यांना शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविता याव्यात यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने ''इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी'' (आयआयटी) या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थेने आयोजिलेल्या ''ई-यंत्र'' या रोबोटीक्स स्पर्धेला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद मिळाला.

First published on: 09-09-2012 at 01:39 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education student iit it technology human resources