व्याख्याता आणि जनरल रिसर्च फेलोशीपसाठीच्या (जीआरएफ) जुन्या निकषांमध्ये आमूलाग्र बदल करून ‘नेट’ परीक्षेच्या तोंडावरच सुधारित पात्रता निकष जाहीर केले आहेत.
नव्या निकषांनुसार किमान गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून पहिल्या १५ टक्के उमेदवारांची अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येणार आहे. तसेच, सर्व विषय आणि गटानुसार स्वतंत्र गुणवत्तायादी तयार करण्यात येणार असल्याने सर्व प्रकारच्या उमेदवारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
हे पात्रता निकष अंतिम असून त्यात बदल केला जाणार नाही, असे जाहीर करून आयोगाने उमेदवारांना दिलासा दिला आहे.
‘विद्यापीठ अनुदान आयोगा’मार्फत ३० डिसेंबरला ‘राष्ट्रीय पात्रता चाचणी’ (नेट) घेण्यात येणार आहे. महाविद्यालयात व्याख्याता पदाच्या नियुक्तीसाठी आणि जीआरएफसाठी उमेदवार नेट पात्र असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ करून आयोगाने नेट परीक्षेचे स्वरूप बदलले. पण, पात्रता निकषांमध्ये जून, २०१२ला परीक्षा झाल्यानंतर आयोगाने बदल केल्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये अन्याय झाल्याची भावना होती.
केरळ उच्च न्यायालयाकडून चपराक मिळाल्यानंतर आयोगाने या चुका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, परीक्षेच्या तोंडावरच नवे पात्रता निकष जाहीर करून आपल्या प्रयत्नांविषयी किती प्रामाणिक आहे, याची चुणूक आयोगाने दाखविली आहे.
नव्या पात्रता निकषांमुळे परीक्षेच्या काठीण्यपातळीनुसार त्या त्या वर्षांचा निकाल जाहीर होणार आहे.
म्हणजे पूर्वीप्रमाणे या परीक्षेतही १००, १०० आणि १५० गुणांचे तीन पेपर असतील. या तिन्ही पेपरमध्ये किमान अनुक्रमे ५०, ५० आणि ७५ प्रश्न उमेदवारांना सोडवायचे आहेत. उमेदवारांची अॅप्टीटय़ूट तपासणाऱ्या पहिल्या पेपरमधील ६० प्रश्नांपैकी किमान ५० प्रश्न सोडवायचे आहेत. तिन्ही पेपरमधील सर्व प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असतील.
प्रत्येक पेपरमध्ये काही किमान गुण मिळविणारे उमेदवार व्याख्याता आणि जीआरएफसाठी पात्र ठरविण्यात येतील. त्यानुसार पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये खुल्या गटातील उमेदवाराने १०० पैकी किमान ४० टक्के (ओबीसींसाठी ३५ आणि अपंग, एससी, एसटींसाठी ३५टक्के) गुण मिळविणे बंधनकारक आहे. तिसऱ्या पेपरमध्ये खुल्या गटातील उमेदवाराने १०० पैकी ५० टक्के गुण मिळविणे बंधनकारक राहील. ओबीसी आणि अपंग, एससी, एसटींसाठी ही अट अनुक्रमे ४५टक्के आणि ४० टक्के अशी असेल.
हा पहिला किमान गुणांचा टप्पा पार करणाऱ्या उमेदवारांमधून प्रत्येक विषय आणि गटाची स्वतंत्र गुणवत्तायादी तयार केली जाईल. तिन्ही पेपरचे एकूण गुण यासाठी ग्राह्य धरले जातील आणि या दोन्ही गुणवत्तायादीतील पहिले १५ टक्के उमेदवारच व्याख्यातापदासाठी पात्र ठरविले जातील. या यादीतील काही उमेदवारांना जीआरएफसाठी पात्र ठरविले जाईल.
‘आधीच्या नेटमध्ये अमुक इतक्या गुणांची कमाई करणाऱ्या उमेदवारांनाच पात्र ठरविले
जात होते. परंतु, आता किमान गुणांच्या आधारे विषय आणि गटानुसार तिन्ही पेपर मधील एकत्रित गुणांआधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याने प्रत्येक विषयाला आणि गटाला (कॅटेगरी) न्याय मिळेल, असा विश्वास रूपेश मोरे या उमेदवाराने व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा