विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेला बसताना निव्वळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करूच द्यायचे नाही. अभ्यासेतर गोष्टींवरच विद्यार्थी आणि पालकांनी आपली शक्ती वाया घालवावी, असा जणू राज्याच्या शिक्षण विभागाचा पणच आहे. गेली अनेक वर्षे प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका, ऑनलाइन प्रवेश, प्रवेश याद्या असे गोंधळ विद्यार्थी सहन करीत आहेत. यंदांचे वर्षही त्याला अपवाद ठरलेले नाही. बारावीच्या उत्तर पत्रिकांचे गठ्ठे साचत चालल्याने ते विद्यार्थी चिंतेत असतानाच दहावीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरही परीक्षेआधीच चिंतेची टांगती तलवार आहे.
दहावी परीक्षांच्या प्रवेशपत्रांमध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने अक्षम्य घोळ घातले आहेत. काहींची छायाचित्रेच नाहीत तर, काहींच्या नावातच गोंधळ, कुणाचे माध्यमच बदलले तर कुणाचा आसनक्रमांक चुकलेला, कुणाला दोन प्रवेशपत्र असे एक ना अनेक गोंधळ या प्रवेशपत्रांच्या बाबतीत झाले आहेत. बुधवारी या प्रवेशपत्रांचे वाटप करताना या सर्व बाबी समोर आल्या.
प्रवेशपत्रांमधील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून प्रवेशपत्र दुरूस्तीसाठी धावाधाव करावी लागणार आहे. यामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मंडळाने पूर्व यादी उशीरा दिल्याने या गोंधळास सुरुवात झाल्याचा आरोप मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी केला. या पूर्व यादीत अतोनात चुका निदर्शनास आल्या. यामध्ये जवळपास एक लाख ६० हजार विद्यार्थ्यांची नावेच नव्हती. यातील दुरुस्त्या शाळांनी मंडळाकडे कळविल्या होत्या. त्यानंतरही आता प्रवेशपत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चुका आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच मिळालेले नाहीत. तर काहींच्या प्रवेशपत्रांमध्ये नाव, माध्यम, अंकी आणि अक्षरी आसन क्रमांकांमधील तफावत असे विविध प्रकार समोर आले आहेत. या सर्व चुका दुरूस्त करून मंडळाकडे २८ तारखेपर्यंत सादर करावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र महाशिवरात्रीच्या सुटीमुळे हे सर्व काम करण्यासाठी शाळांना केवळ एकच दिवस मिळणार त्यात या चुका दुरूस्त होणे अवघड असल्याचेही रेडीज म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर छायाचित्र नाही त्यांनी छायाचित्र वेळेत नाही आणून दिले तर मुख्याध्यापकांनी काय करायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मंडळाने प्रवेशपत्रांवर परीक्षा केंद्राचा क्रमांक दिला आहे. मात्र परीक्षा केंद्रांची यादीच अद्याप जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा केंद्रांबाबतही गोंधळ असल्याचे रेडीज म्हणाले.
दहावीच्या प्रवेशपत्रांमध्ये अक्षम्य घोळ
विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेला बसताना निव्वळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करूच द्यायचे नाही. अभ्यासेतर गोष्टींवरच विद्यार्थी आणि पालकांनी आपली शक्ती वाया घालवावी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2014 at 03:41 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Error in ssc students hall tickets