राज्यात सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत गणित व रसायनशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांत चुका झाल्याचे आढळून आले आहे. गणिताच्या एका प्रश्नामध्ये एकक चुकले होते, तर रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत स्पेलिंग व मुद्रितशोधनाच्या चुका होत्या. परीक्षा मंडळाच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांना मात्र दोन्ही विषयांचे मिळून पाच गुण मिळण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांना हे गुण दिले जातील. मात्र, गुण देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे राज्य परीक्षा मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.
गणित व रसायनशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांत चुका झाल्याचे परीक्षा मंडळाच्या बैठकीत आढळून आले होते. प्रश्नाचे स्वरूप चुकीचे नसल्याने गुण द्यायचे किंवा कसे याबाबत विचार करून मगच निर्णय घेण्यात येणार आहे. कोणत्या प्रश्नाचे गुण द्यावेत याबाबत परीक्षा मंडळाने आपले अहवाल राज्य मंडळाकडे दिले आहेत. ते विचारार्थ विभागीय मंडळांना कळवण्यात आले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परीक्षा मंडळातील काही सदस्यांनी गणित आणि रसायनशास्त्र विषयाचे मिळून ११ गुण देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. याबाबत राज्य मंडळाचे अधिकारी अनभिज्ञ होते. मंडळाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच सदस्यांनी माहिती जाहीर केल्याबद्दल या सदस्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा परीक्षा मंडळ आणि राज्य मंडळाचा प्रशासकीय विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याचे समोर आले आहे.
गणित-रसायनच्या प्रश्नपत्रिकांत चुका झालेल्या प्रश्नांचे गुण देण्याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.
– कृष्णकुमार पाटील, राज्य मंडळाचे सचिव
दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार
दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा शनिवारी होती. या परीक्षेदरम्यान राज्यभरातून ७२ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक म्हणजे ३२ गैरप्रकार नोंदवण्यात आले आहेत. नाशिकमध्ये २५, औरंगाबादमध्ये ९, पुण्यात ३, नागपूरमध्ये २ आणि मुंबईत एका गैरप्रकाराची नोंद करण्यात आली आहे.