महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. आयोगाने २०१५ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले खरे. मात्र, अद्याप या वर्षी झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे या वेळीही पुढील परीक्षेचे अर्ज भरायचे की नाहीत याबाबत उमेदवारांसमोर प्रश्नचिन्हच असणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पुढील वर्षांचे वेळापत्रक आयोगाने नुकतेच जाहीर केले. त्यानुसार डिसेंबरमध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. पुढील वर्षी म्हणजे २०१५ मधील राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही ५ एप्रिलला होणार आहे, तर मुख्य परीक्षा ही १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
आयोगाने पुढील वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले, तरीही झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. आयोगाकडून २०१४ ची राज्यसेवा मुख्य परीक्षा ३०, ३१ मे आणि १ जून या दिवशी घेण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारख्या महत्त्वाच्या पदांसह अ आणि ब गटातील १८३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेची उत्तरतालिका आयोगाने १० जून रोजीच जाहीर केली आहे. मात्र, अद्यापही निकाल जाहीर झालेला नाही. उत्तरसूचीवर आलेल्या आक्षेपांमुळे निकाल लांबल्याचे आयोगाकडून सांगण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा