उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे वेळेपत्रक वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे ठरले आहे. शास्त्र आणि कला शाखेच्या गणिताच्या पेपरची एकापाठोपाठ येणारी तारीख मंडळाने बदलून दिली, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अशाच प्रकारचा अन्याय होत असताना त्याकडे मात्र मंडळाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची तक्रार केली जात आहे. नगर जिल्ह्य़ातील संस्थाचालकांनी यासंदर्भात मंडळाकडे दाद मागूनही त्याची साधी दखल घेण्यात आलेली नाही.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमानुसारच गणिताचे दोन पेपर (गणित-१ आणि गणित-२) लागोपाठ घेतले जात नाही. विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय पाहून हा निर्णय घेण्यात आला. यंदा येत्या दि. २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. मूळ वेळापत्रकाप्रमाणे शास्त्र, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांचे गणिताचे पेपर (अनुक्रमे गणित-१ व गणित-२) दि. १ व २ मार्चला होणार होते. त्यात सुट्टी देण्यात आली नव्हती. त्यावर मुंबईतून जोरदार आक्षेप घेण्यात आला. मुंबईतील अनेक शिक्षण संस्था व पालकांनीही याबाबत तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन शास्त्र व कला शाखेच्या गणिताच्या पेपरची तारीख बदलून देण्यात आली. या बदलानुसार आता गणित-१ या विषयाचा पेपर दि. १ मार्च ऐवजी दि. ४ मार्चला होणार आहे.
कला आणि वाणिज्य शाखेच्या या विषयाच्या पेपरची तारीख बदलताना वाणिज्य शाखेच्या वेळापत्रकाकडे मात्र मंडळाचे साफ दुर्लक्ष झाले. या शाखेच्या गणिताच्या पेपरमध्ये मंडळाने कोणताही बदल केलेला नाही. दोन पेपरमध्ये विशेषत: गणितासारख्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयाबाबत शास्त्र व वाणिज्य शाखेची काळजी घेताना वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मात्र हा निकष लावण्यात आलेला नाही, ही गोष्ट या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याची भावना शिक्षण संस्थांसह हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये निर्माण झाली आहे. वाणिज्य शाखेचे गणिताचे दोन्ही पेपर ठरल्यानुसार म्हणजे दि. १ व २ मार्चलाच होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शास्त्र व कला शाखेचे मूळ वेळापत्रक बदलताना गणिताच्या सांकेतिक क्रमांकाचा (कोडनंबर) गोंधळ झाला असल्याचे सांगण्यात येते. शास्त्र व कला शाखेच्या गणित या पेपरचा सांकेतिक क्रमांक ४० आहे, तर वाणिज्य शाखेच्या गणिताच्या पेपरचा सांकेतांक ८८ आहे. मुंबईतून तक्रारी आल्यानंतर या संकेतांकानुसार कारवाई करीत मंडळाने शास्त्र व कला शाखेचे वेळापत्रक बदलले. वाणिज्य शाखेचा सांकेतांक वेगळा असल्याने त्याकडे मात्र मंडळांचे लक्ष गेले नाही, असे नगर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकानेच सांगितले. मंडळातूनच ही माहिती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शास्त्र-कला शाखांवर मेहेरनजर, वाणिज्य शाखा वाऱ्यावर!
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे वेळेपत्रक वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे ठरले आहे. शास्त्र आणि कला शाखेच्या गणिताच्या पेपरची एकापाठोपाठ येणारी तारीख मंडळाने बदलून दिली, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अशाच प्रकारचा अन्याय होत असताना त्याकडे मात्र मंडळाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची तक्रार केली जात आहे.
First published on: 06-02-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Favour on science art faculty commerce faculty on the air