यंदाच्या बारावीच्या वाढलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या बहुतांश जागा ‘इनहाऊस’ विद्यार्थ्यांनीच भरल्या जाणार असल्याचे मंगळावारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या ‘कटऑफ’ यादीने स्पष्ट केले. त्यामुळे, काही महाविद्यालयांमध्ये काही अभ्यासक्रमांकरिता दुसरी यादी लागण्याची शक्यता कमी आहे.
मुंबईतील महाविद्यालयांनी बुधवारी एकाच वेळी ही यादी जाहीर केली. परंतु यंदा बारावीच्या वाढलेल्या निकालामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी फारच कमी असणार असल्याची प्रतिक्रिया रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार देसाई यांनी व्यक्त केली.
मुंबईतील महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक कटऑफ झेवियर्सच्या कला शाखेची आहे. कुठल्याही स्वयंअर्थसहाय्यित वाणिज्य किंवा विज्ञान शाखेला हा मान मिळालेला नाही हे विशेष. त्याखालोखाल एनएम, एचआरच्या वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे दिसते. अनेक अभ्यासक्रमांची कटऑफ इतकी जास्त आहे की, केवळ पाच ते सात बाहेरच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे महाविद्यालयांना शक्य झाले आहे. स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठी ठरावीक महाविद्यालयांना पसंती देण्याकडेच यंदाही विद्यार्थ्यांचा कल राहिला. त्यामुळे अशा महाविद्यालयांचा कटऑफ यंदाही अधिकच राहिला आहे.
तारेवरची कसरत
शाळेशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमधून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बारावीचा निकाल चांगला लागल्यामुळे पदवी महाविद्यालयांमध्ये त्या महाविद्यालयाशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा कमी राहिल्या आहेत. यामुळेच यंदा कट ऑफ वाढल्याचेही सांगितले जात आहे.
कला शाखा ९० टक्के
कला शाखेला या वर्षीही काही ठरावीक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पसंती आहे. नेहमीप्रमाणे कला शाखेची कटऑफ झेवियर्समध्ये सर्वाधिक (९७.८०टक्के)आहे. त्या खालोखाल रुईयाला हा मान मिळत असे. परंतु यंदा रुईयाला रुपारेलने मागे टाकले आहे. कारण रुपारेलची कला शाखेची पहिली यादी यंदा ९३.५३ टक्क्य़ांना बंद झाली आहे. त्याखालोखाल रुईयाची (९०.९२ टक्के) कटऑफ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा