कोटय़वधींच्या गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीचे आदेश
अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालये दुसऱ्या पाळीत चालवीत असल्याचे दाखवून एकाच पाळीत महाविद्यालयांचा कारभार हाकून कोटय़वधी रुपयांची माया अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही शिक्षणसम्राट बिनधास्तपणे गोळा करीत आहेत. शिक्षकांची पिळवणूक, तंत्रशिक्षण संचालनालय तसेच शासनाची खुलेआम फसवणूक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या या अभियांत्रिकी शिक्षणातील सर्वात मोठय़ा घोटाळ्याची पाळेमुळे उघडी पडली असून हादरलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने आता चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) दुसऱ्या पाळीत अभियांत्रिकी तसेच पदविका तंत्रशिक्षण महाविद्यालये चालविण्यास २००८ सालापासून परवानगी दिली. दुसऱ्या पाळीत अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालविताना स्वतंत्र अध्यापक, कर्मचारीवर्ग नियुक्त करणे ‘एआयसीटीई’ने बंधनकारक केले होते. एवढेच नव्हे तर प्राचार्यही स्वतंत्र असणे आवश्यक होते. पहिल्या पाळीत सकाळी आठ ते पाच तर दुसऱ्या पाळीत दुपारी दोन ते नऊ या वेळात महाविद्यालय चालविणे अपेक्षित होते. यासाठी प्रतिविद्यार्थी ‘शिक्षण शुल्क समिती’कडून सुमारे दोन हजार रुपयांची वाढही या महाविद्यालयांना मंजूर करण्यात आली. तथापि राज्यातील बहुतेक अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यालये ही एकाच पाळीत चालत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शासनाची तसेच विद्यार्थ्यांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाली असून दुसऱ्या पाळीतील सर्व महाविद्यालयांची चौकशी करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत, असे राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी सांगितले.
राज्यात दुसऱ्या पाळीमध्ये चालविली जाणारी ८५ अभियांत्रिकी महाविद्यालये असून यातील विद्यार्थी प्रवेश क्षमता ९७८० एवढी आहे तर पदविकाची १६७ तंत्रशिक्षण महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता २८,९९० एवढी आहे.गेल्या पाच वर्षांत किमान दीड लाख विद्यार्थ्यांच्या नावे दोन हजार रुपयांप्रमाणे प्रशासकीय व्यवस्थेच्या नावाखाली संबंधित महाविद्यालयांनी पैसे उकळले आहेत. यामध्ये ‘एआयसीटीई’, डीटीई, विद्यापीठ तसेच शासनाची सरळ सरळ फसवणूक करण्यात आली असून कोटय़वधींचा गैरव्यवहार झाल्याचे ‘सिटिझन फोरम’ या संस्थेचे प्राध्यापक राहुल अंबेकर व प्राध्यापक वैभव नरवडे यांनी मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मोक्का’अंतर्गत कारवाईची मागणी
‘सिटिझन फोरम’ने लिहिलेल्या पत्रात संबंधित संस्थाचालक, प्राचार्य तसेच ‘एमएसबीटीए’च्या अधिकाऱ्यांनी संगनमताने हा शैक्षणिक भ्रष्टाचार केला असून संबंधितांवर संगनमताने केलेल्या घोटाळ्याबद्दल ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची मागणीही प्राध्यापक वैभव नरवडे यांनी केली आहे.

‘मोक्का’अंतर्गत कारवाईची मागणी
‘सिटिझन फोरम’ने लिहिलेल्या पत्रात संबंधित संस्थाचालक, प्राचार्य तसेच ‘एमएसबीटीए’च्या अधिकाऱ्यांनी संगनमताने हा शैक्षणिक भ्रष्टाचार केला असून संबंधितांवर संगनमताने केलेल्या घोटाळ्याबद्दल ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची मागणीही प्राध्यापक वैभव नरवडे यांनी केली आहे.