जागतिक मंदीचा पहिला फटका व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांना बसला असून केवळ भारताच नव्हे तर जगभरात या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये विद्यार्थ्यांअभावी गळती लागल्याचे चित्र आहे. याला अपवाद अर्थातच अमेरिका या महासत्तेचा. उर्वरित देशांमध्ये, विशेषकरून आशिया पॅसिफिक देशांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांना परदेशी विद्यार्थ्यांकडून असलेली मागणी प्रचंड कमी झाली आहे. त्यातही व्यवस्थापनातील अर्धवेळ अभ्यासक्रमांमधील प्रवेशाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे.
जगभरातील व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांमधील प्रवेश जी-मॅट या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून केले जातात. या परीक्षेच्या अनुषंगाने व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांच्या मागणीबाबत जागतिक स्तरावर असलेल्या परिस्थितीचा आढावा दरवर्षी जी-मॅक या अभ्यास अहवालात घेतला जातो. या वर्षी प्रकाशित झालेल्या जी-मॅक अहवालात अर्धवेळ अभ्यासक्रमांच्या मागणीत लक्षणीय घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
विविध प्रकारच्या अर्धवेळ अभ्यासक्रमांपैकी केवळ २९ टक्के अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर ५३ टक्के अर्धवेळ अभ्यासक्रमांमध्ये ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. तर १८ टक्के अभ्यासक्रमांमध्ये मागणी स्थिर आहे. आशिया पॅसिफिक देशांमधील प्रवेशांवर मात्र मंदीचा चांगलाच परिणाम झाला आहे. या राष्ट्रांमध्ये तर देशी विद्यार्थ्यांच्या अर्जातही घट नोंदविण्यात आली आहे.
चीन, भारतसारख्या देशांमधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमुळे जागतिक मंदीच्या वातावरणातही अमेरिकेतील बी-स्कूल्सना असलेली मागणी कायम आहे. उलट ती यंदा वाढलेली दिसते. २००८ आणि २००९ या जागतिक मंदीच्या काळातही पूर्णवेळ व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जामध्ये वाढ झाली होती. २०१० आणि २०११मध्ये मात्र अर्जामध्ये घट होऊ लागली. ही परिस्थिती सावरली ती २०१२मध्ये. या वर्षीही अर्जाची संख्या स्थिर आहे, असे जी-मॅटचे उपाध्यक्ष (संशोधन आणि विकास) लॉरेन्स रूडनर यांनी सांगितले.

जी-मॅकच्या अहवालातील काही ठळक मुद्दे
*२०१२मध्ये ३०,२१३ भारतीयांनी ही परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २४ टक्के होती.
* युरोपीय शिक्षणसंस्थांमधील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

Story img Loader