संगणकाद्वारे घेण्यात आलेल्या एमबीएच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) बरेच चुकीचे प्रश्न असण्यासोबत अन्य त्रुटीही होत्या. त्यामुळे ही परीक्षा नव्याने घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीईटी निकालाच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी स्थगिती दिली.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली. याप्रकरणी करण्यात आलेल्या याचिका प्रलंबित असल्याने सीईटी निकालानुसार सरकारी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे न्यायालयाला देण्यात आली. त्यावर खासगी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया मात्र सुरूच असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत न्यायालयाने खासगी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियांनाही पुढील आदेशापर्यंत स्थगिती देत प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ठेवली. दरम्यान, या प्रकरणी नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांसमोरही याचिका करण्यात आल्या असून या सगळ्यांची एकत्रित सुनावणी न्यायालय घेणार आहे.

Story img Loader