बारावीच्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा नसताना पेपर कठीण कसा म्हणता येईल, असा सवाल करत जादा गुणांची शक्यता ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने फेटाळून लावली आहे. भौतिकशास्त्र हा विषय असाही कठीण समजला जातो. पण, या विषयाच्या सोमवारी झालेल्या पेपरची काठीण्यपातळी फारच जास्त होती, असा आरोप काही विद्यार्थी आणि शिक्षकांकडून केला जात आहे. या प्रश्नपत्रिकेतील ९० टक्के प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते असेही काहींचे म्हणणे आहे. तर पेपरसाठी दिला गेलेला वेळ अपुरा होता, अशी काही विद्यार्थी-शिक्षकांनी तक्रार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने मात्र या बाबी फेटाळून लावल्या आहेत. ‘भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा किंवा चुकीचा नव्हता. तसेच, एकूण ७० गुणांच्या प्रश्नांसाठी तीन तासांचा वेळही पुरेसा आहे. मग प्रश्नपत्रिका फारच कठीण होती हे कशाच्या आधारे म्हणायचे,’ असा सवाल मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी केली. भौतिकशास्त्राच्या परीक्षेत जादा गुण देण्याची मागणीही त्यांनी फेटाळून लावली आहे.
काही विद्यार्थी-शिक्षकांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. या पेपरमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीच नव्हते, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सोमवारी झालेली परीक्षा ही भौतिकशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित होती. त्यामुळे, प्रश्नांचे स्वरूप नेमके कसे असणार याचा अंदाज विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही (आणि काही क्लासचालकांनाही) नव्हता. आधी विचारले गेलेले प्रश्नच थोडय़ाफार फरकाने विचारले जात असल्याने मुलांना प्रश्नांचे साधारण स्वरूप माहिती असते.
‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या (सीबीएसई) धर्तीवर तयार करण्यात आलेला भौतिकशास्त्राचा सुधारित अभ्यासक्रम वेगळा आहे. त्यामुळे, प्रश्नांचा अंदाज न आल्याने पेपर कठीण वाटण्याची शक्यता आहे,’ अशी प्रतिक्रिया भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांनी दिली. ‘ज्या विद्यार्थ्यांनी पाठय़पुस्तक व्यवस्थित अभ्यासले असेल त्यांना पेपर लिहिण्यात कोणतीच अडचण यायला नको,’ असे टी. पी. भाटिया महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख अमोल बागवे यांनी म्हटले. 

Story img Loader