महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरुवात होत असून पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा होत आहे. राज्यामध्ये १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्येत सव्वा लाखाची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १२ लाख ५४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.
परीक्षार्थीमध्ये ७ लाख ५७ हजार १३६ विद्यार्थी असून ५ लाख ८२ हजार ६६ विद्यार्थिनी आहेत. राज्यातील ७ हजार ९५४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २ हजार ३८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पुणे विभागामध्ये २ लाख २२ हजार १६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षी ही संख्या २ लाख २ हजार ८८७ एवढी होती, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कृष्णकुमार पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येणार नाही याची दक्षता घेऊनच परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये पुरेसा खंड ठेवण्यात आला आहे.
 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धतीचा अवलंब केला आहे. अध्ययन अक्षम आणि स्वमग्न विद्यार्थ्यांना गणित विषय सर्व शाखा, पुस्तकपालन आणि लेखाकर्म (बुक कीपिंग अँड अकौन्टन्सी) या विषयासह भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षेसाठी गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही सवलत केवळ विशेष विद्यार्थ्यांना असून त्यांना साधाच गणकयंत्र वापरता येणार आहे.
 माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असून १ हजार १८६ केंद्रांवरून ९३ हजार ९२ विद्यार्थी ही परीक्षा देतील.
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्य़ासाठी सात याप्रमाणे राज्यात २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
 याखेरीज प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून विशेष महिला भरारी पथक नियुक्त करण्यात आले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

शाखा – शाखानिहाय विद्यार्थी संख्या
विज्ञान – ४ लाख ७९ हजार १९
कला – ४ लाख ५२ हजार ४८६
वाणिज्य – ३ लाख ४९ हजार १४६
एमसीव्हीसी – ५८ हजार ५५१
(किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम)

Story img Loader