‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी २०१४ मध्ये होऊ घातलेली ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा संगणकाच्या आधारे घेण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे.
जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २०१३ प्रमाणे पुढील म्हणजे २०१४ मध्येही प्रत्येक शिक्षण मंडळाचे पहिले २० पर्सेटाईल विद्यार्थी जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत. अर्थात तत्पूर्वी ते जेईई-मुख्य या पहिल्या टप्प्यावरील परीक्षेत पात्र व्हायला हवे. आयआयटी प्रवेशासाठीच्या या फार्मुल्यात सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, पुढील वर्षी ही परीक्षा पारंपरिक लेखी पद्धतीबरोबरच संगणकाआधारे घेण्याचा विचार आहे. २०१४ च्या आयआयटी प्रवेशांबाबत नियम ठरविण्यासाठी आयआयटीच्या ‘संयुक्त प्रवेश मंडळा’ची बैठक रविवारी पार पाडली. त्या दरम्यान झालेल्या चर्चेत जेईई-अ‍ॅडव्हान्स संगणकाआधारे घेण्याचा विचार पुढे आला. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत या संबंधात निश्चित निर्णय होणार आहे.
२०१४ साली जेईई-अ‍ॅडव्हान्स संगणकाच्या आधारे घेता येईल का? किंवा किमान तसा पर्याय विद्यार्थ्यांना देता येईल का, याचा विचार बैठकीदरम्यान करण्यात आल्याचे मुंबई आयआयटीचे संचालक देवांग खक्कर यांनी सांगितले. ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स केवळ दीड लाख निवडक विद्यार्थी देतात. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने परीक्षा संगणकाच्या आधारे घेणे सोपे झाले आहे,’ अशी पुष्टी त्यांनी जोडली.
‘एक राष्ट्र, एक सीईटी’च्या धोरणाचा भाग म्हणून अभियांत्रिकी प्रवेशासाठी २०१३ मध्ये पहिली जेईई-मुख्य परीक्षा घेण्यात आली. देशभरातून तब्बल १२ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जेईई-मुख्य या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लेखीबरोबरच संगणकाआधारे परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यावेळी अवघ्या एक लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी संगणकाआधारे परीक्षा दिली होती.
या विद्यार्थ्यांपैकी नेमके किती विद्यार्थी जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर संगणकाआधारे परीक्षा घ्यायची की नाही याबाबत विचार केला जाणार आहे.

Story img Loader