शिक्षकांच्या कमतरतेमुळे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेने आपले पूर्वतयारी वर्गामध्ये ‘एकमेका सहाय्य करू’चे धोरण अवलंबले आहे. कामाची जबाबदारी वाटून घेण्यासाठी तीन किंवा चार आयआयटी मिळून हे वर्ग चालविणार आहेत.
विविध राखीव प्रवर्गातील जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या ज्या विद्यार्थ्यांना किमान पात्रता गुणांपेक्षाही (कटऑफ) कमी गुण असतात त्यांच्याकरिता आयआयटी एक वर्षांचे पूर्वतयारी वर्ग (प्रिप्रेटरी) चालविते. हे वर्ग ‘प्रिप क्लासेस’ म्हणून ओळखले जातात. १९९५ पासून आयआयटीत ही व्यवस्था राबविली जात आहे. पण, मागील दोन वर्षे अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय या राखीव प्रवर्गातील जागा भरण्यासाठी आयआयटीला कटऑफ खाली आणावी लागली नव्हती. परिणामी या दोन राखीव प्रवर्गाकरिता दोन वर्षे हे पूर्वतयारी वर्गही आयआयटीला घ्यावे लागले नव्हते. पण, यंदा जेईईच्या प्रवेशविषयक नियमात मोठय़ा प्रमाणावर बदल झाले. त्याचा परिणाम असा झाला की वरील दोन राखीव प्रवर्गातील जागा भरण्यासाठी कटऑफ आयआयटीला खाली आणावी लागली. परिणामी ज्या विद्यार्थ्यांना कटऑफ पेक्षा कमी गुण आहेत त्यांच्यासाठी पूर्वतयारी वर्ग घ्यावे लागणार आहेत. वर्षभराच्या पूर्वतयारी वर्गामध्ये पुढील अभ्यासक्रम झेपेल, या दृष्टीने विद्यार्थ्यांकडून तयारी केली जाते.
आतापर्यंत प्रत्येक आयआयटी आपल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे हे वर्ग चालवित असे. पण, आता काही आयआयटींनी मिळून एकत्रितपणे पूर्वतयारी वर्ग चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयआयटी-रूरकीमध्ये आयआयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-मंडी येथील विद्यार्थाकरिता एकत्रितपणे वर्ग घेण्यात येणार आहेत. तर आयआयटी-मद्रास आपल्या मुलांबरोबरच आयआयटी-मुंबई, आयआयटी-हैदराबाद आणि आयआयटी-गांधीनगर येथील विद्यार्थ्यांकरिताही वर्ग घेणार आहे. तर आयआयटी-खरगपूर आयआयटी-पाटणा आणि आयआयटी-भुवनेश्वर यांच्याकरिता एकत्रितपणे वर्ग घेईल. या वर्षी अपंग कोटय़ातून २७६ आणि अनुसूचित जमातींसाठीच्या राखीव कोटय़ातून २०० विद्यार्थ्यांकरिता पूर्व तयारी वर्ग घेतले जाणार आहेत.
पूर्वतयारी वर्गामध्ये या वर्षी फारच थोडे विद्यार्थी आहेत. त्यामुळे प्रत्येक कॅम्पसवर फार थोडय़ा विद्यार्थ्यांकरिता हे वर्ग घेण्याऐवजी आम्ही ते एकत्रितपणे घेण्याचे ठरविले आहे, असे आयआयटी-मुंबईचे संचालक देवांग खक्कर यांनी सांगितले. नव्याने सुरू झालेल्या आयआयटीमध्ये प्राध्यापक आणि जागेची कमतरता आहे. त्यामुळे हे वर्ग चालविणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे, या आयआयटीमधील विद्यार्थ्यांची जबाबदारी जुन्या संस्थांनी घेण्याचा विचार पुढे आला.