‘गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात १० वर्षांपूर्वी बॉम्बस्फोट झाला आणि त्यामुळे उल्हासनगरात राहणाऱ्या यादव कुटुंबाच्याच चिंधडय़ा उडाल्या.. या स्फोटात यादव कुटुंबातील कर्ते हनुमंत यादव आणि त्यांची पत्नी सकी यादव या दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यांची पाच मुले अनाथ झाली.. याच बॉम्बस्फोटातील पीडितांसाठी एक्स्प्रेस समूहाने ‘एक्स्प्रेस रिलिफ फंड’ या निधीची स्थापना केली होती. या निधीमार्फत यादव कुटुंबातील या पाचही लहानग्यांचे भविष्य आकाराला येईल, अशी योजना करत काही रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतवण्यात आली होती. या पाच जणांपैकी सविता यादव आता कायदेशीरपणे सज्ञान झाल्यानंतर तिच्या भविष्याची तरतूद म्हणून उभारलेली रक्कम तिला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम नुकताच एक्स्प्रेस टॉवर येथील ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या कार्यालयात पार पडला.
या दहा वर्षांच्या काळात दुर्दैवाने राजश्री यादवचे निधन झाले. त्या वेळी तिच्या वाटय़ाची रक्कम अन्य चौघांच्या मुदत ठेवीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सविता यादव नुकतीच कायद्याने सज्ञान झाली. तिला तिच्या पुढील शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे कळताच ‘एक्स्प्रेस रिलिफ फंडा’तील रक्कम तिला देण्याचे निश्चित करण्यात आले.
दहा वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटावेळी कार्यरत असलेले एक्स्प्रेस समूहाचे छायाचित्रकार दीपक जोशी यांच्या हस्ते सविताला तीन लाख ५३ हजार ५०१ रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.