‘भारतीय विज्ञान काँग्रेस’च्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे ‘खडक, खनिजे आणि जिवाश्मां’चे देखणे व अभ्यासपूर्ण प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. ३ ते ७ जानेवारीदरम्यान विद्यापीठाच्या कलिना येथील शंकरराव चव्हाण इमारतीच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरेल.
या भव्य प्रदर्शनात विविध प्रकारचे झिओलाइट प्रकारचे मनोहारी खडक, पृथ्वीच्या पोटात सापडणारी उपरत्ने प्रकारातील खनिजे, पृथ्वीवर कोसळलेल्या एका अशनीचा अमूल्य असा मोठा अवशेष, दुर्मीळ झालेल्या नेच्यासारख्या वनस्पतींचे अवशेष, ममाथ नावाच्या हत्तीचे, डायनॉसॉर्सचे आणि अनेकविध अस्तंगत प्राण्यांचे जिवाश्म असे थक्क करणारे नमुने मांडण्यात येणार आहेत. या सर्व नमुन्यांसोबत त्यांची माहिती लिहिलेली असेल. शिवाय अनेक पोस्टर्स मांडण्यात आलेली असतील. माणसाने आपल्या हातांव्यतिरिक्त जी साधने वापरायला सुरुवात केली त्यातील पहिली म्हणजे अश्मयुगीन हत्यारे मांडून पुरातत्त्व आणि भूशास्त्र यांचा जवळचा संबंधही समजावून देण्यात येईल.
खडकांची निर्मिती करणाऱ्या खनिजांबद्दल, खडकांच्या प्रकारांबद्दल, जिवाश्मांच्या निर्मितीबद्दल तसेच अनेक भूशास्त्रीय घटनांबद्दलची माहिती प्रदर्शित करण्यात येईल. या प्रदर्शनास भेट देणाऱ्या १० ते १५ वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा घेण्यात येणार आहे. या प्रदर्शनात इन्स्ट्रसेन ट्रस्ट, महंमद फसिउद्दीन मक्की, विक्रम सिंग राव आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे सहकार्य लाभले आहे.  गटागटांनी येणाऱ्या शाळांनी पुढील क्रमांकांवर सकाळी ११ ते संध्याकाळी ७ दरम्यान संपर्क साधून येण्याची वेळ निश्चित केल्यास विद्यार्थ्यांना सुविधापूर्ण रीतीने प्रदर्शन पाहता येऊ शकेल. संपर्क – ९८२१७८६५०२, ९८९२७६२१५१.

Story img Loader