अधिकाधिक माहिती स्मरणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर केला पाहिजे. उदा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अभ्यासताना, समजा- बिपिनचंद्र यांचे ‘मॉर्डन इंडिया’ नावाचे पुस्तक तुम्ही हातात घेतले आहे. तेव्हा या पुस्तकातील सनावळी तुम्ही एखाद्या कागदावर लिहून महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा एक तक्ता बनवू शकता. वेळ मिळेल तिथे तो कागद डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पूर्ण पुस्तकातील माहिती आठवण्याचा प्रयत्न करू शकता. या क्रियेमध्ये तुम्ही जमा केलेली माहिती तुम्ही ज्ञानामध्ये रूपांतरित करता आणि तुमचे स्वत:चे विश्लेषण पक्के होऊ लागते. दुसरे उदाहरण ‘इंडिया इयर बुक’ या केंद्र शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या जाडजूड पुस्तकाचे घेऊ या. या पुस्तकातील बरीचशी माहिती पूर्वपरीक्षेसाठी मोलाची आहे. मात्र पुस्तकाची पृष्ठसंख्या इतकी जास्त आहे की लक्षात ठेवायचा प्रयत्न केल्यास फार सायास करावे लागतील. परंतु, तुम्ही जर चार जणांचा ग्रुप तयार केला आणि प्रत्येकाने एकेक भाग वाटून घेऊन त्यावर टिपण काढले आणि आळीपाळीने त्या टिपणाची चर्चा केली तर हेच कंटाळवाणे पुस्तक रंजक वाटू लागेल.
अभ्यासाच्या अशा विविध पद्धती योजून तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आवाक्यात आणू शकता. मात्र कोणत्याही क्लासच्या केवळ नोट्सवर अवलंबून राहू नका. ‘पर्यावरणशास्त्र’ – एरक भरूचा, इंडियन पॉलिटी- एम. लक्ष्मीकांत, एनसीइआरटीची शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तके. या पुस्तकांचा संदर्भ साहित्य म्हणून नक्की वापर करा. या पुस्तकांमुळे तुमच्या अभ्यासाची पायाभरणी मजबूत होईल.
पुस्तके अभ्यासण्याचीही नावीन्यपूर्ण पद्धती उपयोगात आणा. रटाळपणे, एकसुरी वाचन केल्यास वाचलेला मजकूर थोडय़ाच काळासाठी स्मरणात राहतो. त्यामुळे वाचन परीक्षाभिमुख करा. उदा. एनसीआरटीच्या पुस्तकांमध्ये पानांवर चौकटीत काही मजकूर दिलेला असतो, तो मजकूर काळजीपूर्वक वाचा. त्यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करा. याच प्रकरणांच्या शेवटी काही दिघरेत्तरी प्रश्न लिहिलेले असतात. त्यांची उत्तरे कमी शब्दात तयार करा. अशा प्रकारे समोर आलेल्या माहितीला प्रश्नांच्या स्वरूपात आविष्कृत करण्याची सवय जर तुमच्या मेंदूला एकदा लागली, तर प्रश्नपत्रिकेत आलेला कोणताच प्रश्न तुम्हाला निरुत्तर करू शकणार नाही.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची आजपासून तयारी केली, तर ज्याप्रमाणे आकाशात घिरटय़ा घालणारी घार जमिनीवरचे भक्ष्य चपळतेने उचलते, त्या सहजतेने तुम्ही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे उत्तर पटकन ओळखाल आणि पूर्वपरीक्षेचे शिखर प्रकाशाच्या वेगाने सर कराल.

Story img Loader