विद्यापीठाच्या संशोधनात्मक विकासासाठी स्वत: मेहनत घ्यायची नाही आणि इतरांनी घेतलेली मेहनतही फलद्रुप होऊ द्यायची नाही, अशी दळभद्री मानसिकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची असल्यानेच ‘अतिदुर्मीळ वनस्पती उद्याना’ची वासलात लावलीच शिवाय लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचे सिद्ध होते आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे जगातील अतिदुर्मीळ वनस्पतींपैकी एक असलेल्या ‘फ्रेरेक इंडिका’कडे दुर्लक्ष करून विद्यापीठाने जैव-विविधता केवळ कागदावर साकारली. मोठा गाजावजा करीत तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या उपस्थितीत ‘नामशेष वनस्पती उद्याना’चे उद्घाटन थाटानाटात करविले. मात्र अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या या वनस्पतींना वेगाने नामशेष करण्यास विद्यापीठानेच सक्रीय भूमिका बजावली. दुर्मीळ वनस्पतीऐवजी अशोकाचे झाड लावून पतंगराव कदमही धन्य झाले आणि तत्कालीन कुलगुरू डॉ. पठाणांनीही भरपूर प्रसिद्धी लाटून घेतली. 
उद्यानासाठी वेगवेगळ्या प्रवर्गातील दुर्मीळ वनस्पती आमगावच्या भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी विद्यापीठाला देऊ केल्या. त्यातील केवळ सेरोपेजिया, ग्लोरिओसा, ऑफियोग्लोसम आणि फ्रेरेक इंडिका ही चार झाडे लावण्यात आल्याचे आणि त्यावर सहा लाख ६९ हजार खर्च झाल्याचे विधिसभेत विद्यापीठाकडून सांगण्यात आले. मात्र विद्यापीठाची बनवाबनवी, त्यात झालेला आर्थिक गैरप्रकार आणि नामशेष करण्यात आलेल्या वनस्पतींची चिरफाड करून भुस्कुटे यांनी विद्यापीठाचे पितळ उघडे पाडले.
एक जुलै २०१०ला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आठ जुलै २०१०ला उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमासंबंधी रूपरेखा ठरवण्यात आली. त्यात उद्यानाच्या जागेवर माती, शेणखत, मुरूम आणि इतर कामे करण्यात आल्याचे बैठकीतच सांगण्यात आले. बरीचशी कामे उद्घाटनापूर्वीच झालेली असताना सहा लाख ६९ हजार रुपये खर्च दाखवून विद्यापीठाने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. उपरोक्त वनस्पती विद्यापीठाला देण्यासाठी खास करून फ्रेरेक इंडिकाचे रोपटे त्यांनी पुण्याच्या बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे उपसंचालक डॉ. पी.जी. दिवाकर यांच्याकडून मिळवले. एका झाडापासून त्याची अनेक झाडे करून त्यांना जगवले, संवर्धन केले आणि त्यांचे अनेक रोपांत रुपांतर करून ती वनस्पती नागपूर विद्यापीठाला दिली. केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर आणि जवळपासच्या भागात ही वनस्पती मिळते. ती विदर्भाच्या मातीत तगवण्याचे काम भुस्कुटे आणि त्यांच्या चमूने केले. इतक्या महत्त्वपूर्ण वनस्पतीची विद्यापीठाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वासलात लागली.

Story img Loader