१९६० साली ‘विशाल मुंबई शिक्षण मंडळा’ने गोरेगावमध्ये सुरू केलेल्या ‘आदर्श विद्यालया’तर्फे सर्वसाधारण व तळागाळातील समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम ज्ञानदानाचा वारसा अखंडपणे चालविला जात आहे. शाळेने आजवर अनेक आदर्श, सुसंस्कृत, गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. कामगार वस्तीत राहून बिकट परिस्थितीत शिक्षण घेणारे शाळेचे विद्यार्थी विविध ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत आहेत.
आपल्या विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यक्तित्व विकास व्हावा, सर्वागीण विकास व्हावा यासाठी शाळेत विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. कला, क्रीडा, विज्ञान, अभ्यास यात आवड निर्माण व्हावी यासाठी चित्रकला, वक्तृत्व, हस्ताक्षर, प्रश्नमंजूषा, निबंध लेखन, अभिनय, गायन, नृत्य, वेशभूषा, क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धाचे आयोजन विविध सणांच्या, आदर्श व्यक्तींच्या दिनविशेषाच्या निमित्ताने नियमितपणे केले जातात. वाङ्मय मंडळ, निसर्ग मंडळ, विज्ञान मंडळ या मंडळांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षांत विविध उपक्रम राबवून त्या अनुषंगाने अनेक स्पर्धा, प्रदर्शने, निसर्गभ्रमण, विज्ञान भ्रमण सहली यांचे आयोजन केले जाते.
निसर्गाचे जतन
निसर्ग आपला पालक-पोषणकर्ता आणि मित्र या भावनेतून त्याचे रक्षण जतन करणे आपले कर्तव्य आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविले जाते. यासाठी परिसर स्वच्छता, वृक्षदिंडी, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन असे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा स्पष्ट व्हाव्यात, त्यांनी विज्ञाननिष्ठ विचार करावा यासाठी विविध प्रयोग, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, प्रश्नमंजूषा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित होतात. विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख व्हावे यासाठी पौढ साक्षरता वर्ग, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, गरजू विद्यार्थी-कुटुंबांना मदत, साहाय्यता निधी यांसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत केले जाते. सांस्कृतिक समिती, क्रीडा समिती, हस्तलिखित समिती अशा समित्यांच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम-उपक्रम सादर केले जातात. कार्यक्रमांचे वैविध्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळे विविध प्रकारची कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात. ज्ञान, कला, क्रीडा प्रेमी विद्यार्थी तयार होतात.
विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन
विज्ञान प्रदर्शन आणि सहशालेय उपक्रम यातील विविध स्पर्धामध्ये आजवर पाच वेळा सवरेत्कृष्ट प्रशाला हा बहुमान शाळेने पटकाविला आहे. समूहगीत, कवायती प्रकार याबरोबरच योग, जिमनॅस्टिक्स, मानवी मनोरे, रोप व लाकडी मल्लखांब प्रात्यक्षिक, लेझीम असे विविध कार्यक्रम साजरे होतात. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते पालकांसोबत केले जाते. हा प्रसंग इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरतो.
सैन्यभरतीसाठी प्रोत्साहन
विद्यार्थ्यांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळावी यासाठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना शाळेत बोलाविले जाते. यात प्रत्यक्ष लढाईत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. सेना दलावर विशेष प्रदर्शन शाळा आयोजित करते.
आपत्कालीन व्यवस्थापन
या विषयाअंतर्गत विविध व्याख्याने आयोजित केली जातात. पर्यावरण संवर्धनासाठी ‘फटाका मुक्त’ दिवाळी सण, होळीत नैसर्गिक रंग वापरणे, सणउत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषण कमी करणे आदी मूल्ये मुलांच्या मनावर रुजविण्यासाठी शाळा उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असते.
वार्षिक हस्तलिखित
हा अत्यंत महत्त्वाचा व सर्जनशील उपक्रम. विद्यार्थ्यांना कविता, कथा, निबंध, आत्मपर लेखन अशा विविध माध्यमांतून व्यक्त ७होण्याची संधी वार्षिक हस्तलिखिताच्या माध्यमातून दिली जाते. भाषा विकास हा या मागील प्रमुख उद्देश असतो. म्हणून कुमारजगत नावाचे हस्तलिखित प्रसिद्ध केले जाते.
ई-लर्निग
ई-लर्निगच्या माध्यमातून प्रत्येक वर्गात पुस्तकांतील ज्ञान-माहिती चित्रांच्या व चलतचित्रांच्या माध्यमातून सोपे करून शिकविले जाते. त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणक साक्षर आहे.
सर्वाना सोबत घेऊन उत्तम काम करण्यास प्रवृत्त करणारा कुशल प्रशासक अधिकारी वर्ग शाळेला लाभला आहे. तसेच, उपक्रमशील शिक्षक-शिक्षकेतर, होतकरू विद्यार्थी आणि सजग पालक यांच्या सांघिक योगदानाचे फळ यामुळे शाळेचा शैक्षणिक, सांस्कृतिक, सामजिक झाला आहे.

Story img Loader