बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेले, आई अंगणवाडी ताई, दहावीपर्यंतचे शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत, हा क्रांती काशिनाथ डोंबे या युवतीचा भूतकाळ आहे, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यातून मुलींमध्ये जिल्हा उपनिबंधकाच्या यादीत पहिली येण्याचा मान तिने मिळवला!
शनिवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ४६४ गुण मिळवून क्रांती काशिनाथ डोंबे ही राज्यात जिल्हाउपनिबंधकांच्या यादीत मुलीतून प्रथम आली.
तीन महिन्यांपूर्वीच औरंगाबाद येथे विक्रीकर निरीक्षकपदावर रुजू झालेल्या क्रांतीचा आधीचा प्रवास मात्र खडतर आहे. पाथरी तालुक्यातल्या हदगाव येथे क्रांतीची आई अंगणवाडी ताई आहेत. अवघ्या दोन वर्षांची असताना क्रांतीचे वडील मृत्यू पावले.
क्रांतीचे शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याच वेळी क्रीडाशिक्षक असलेल्या कैलास माने यांनी तिच्यातील जिद्द हेरली होती. आव्हानांना तोंड द्यायला तिला आवडते, हे माने यांनी जाणले.
क्रांतीचे महाविद्यालयीन शिक्षण जिजाऊ ज्ञानतीर्थ या गुरुकुलात झाले. सर्व शिक्षकांनीच तिला आर्थिक मदत केली होती. कला शाखेत मराठवाडय़ातून द्वितीय येऊन त्या वेळी तिने हा विश्वास सार्थ ठरवला. बारावीनंतर डी.एड. पूर्ण करून शिक्षकासाठीची पात्रता परीक्षा ती उत्तीर्ण झाली.
पण अल्पसंतुष्ट न राहता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने थेट पुणे गाठले. तीन महिन्यांपूर्वीच विक्रीकर निरीक्षक या पदावर क्रांती औरंगाबादला रुजू झाली.
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आला आणि ती आता जिल्हा उपनिबंधक या पदाकरिता उत्तीर्ण झाली आहे. रविवारी तिने उपजिल्हाधिकारी या पदासाठीही परीक्षा दिली. पेपर सोडविल्यानंतरचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. आपल्या या यशात आईच्या परिश्रमाचा वाटा ती अत्यंत कृतज्ञतेने नमूद करते. कैलास माने यांच्यासारखे शिक्षक जर मिळाले नसते, तर ही धडपड सार्थकी लागली नसती. या यशात त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे, असेही क्रांतीने सांगितले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दैनिक ‘लोकसत्ता’ची खूपच मदत झाल्याचेही तिने अभिमानाने सांगितले.

Story img Loader