राज्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात भारनियमनाचा त्रास होऊ नये यासाठी २१ फेब्रुवारी ते २८ मार्च या परीक्षांच्या कालावधीत राज्यातील रात्रीचे भारनियमन रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यात भारनियमन सुरू झाल्यापासून दहावी-बारावी परीक्षांसाठी भारनियमनात दिलासा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. पण रात्रीच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येतो. राज्यात यापूर्वी अनेकदा गणेशोत्सव, रमजान या कालावधीत रात्रीचे भारनियमन रद्द झाले आहे. पण विद्यार्थ्यांना आजवर दिलासा मिळाला नव्हता. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रथमच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी रात्रीचे भारनियमन रद्द करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यात सध्या विजेची मागणी सरासरी १४ हजार मेगावॉट असून उपलब्धता १३ हजार ५०० मेगावॉट आहे. विजेची तूट सरासरी ५०० मेगावॉट आहे.
 राज्यातील अ ते ड या गटातील भारनियमन यापूर्वीच रद्द झाले आहे.तर ई, फ, आणि ग १ ते ग ३ या गटांमध्ये भारनियमन सुरू असून राज्याचा सुमारे २५ टक्के भाग त्यात मोडतो. या भागांमध्ये सायंकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत भारनियमन असते. हे चार तासांचे भारनियमन रद्द करण्यासाठी सरासरी ३०० मेगावॉट जादा विजेची गरज असून कोयना जलविद्युत प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करून ती गरज भागवली जाईल, असे ‘महावितरण’च्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader