मुंबईसह ठाणे, रत्नागिरी येथे १७ आणि २४ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाचा शाळांमधील परीक्षांच्या वेळापत्रकावर नसला तरी अभ्यासाच्या उजळणी व निकालावर परिणाम होण्याची भीती मुख्याध्यापक व संस्थाचालकांना वाटते आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामाकरिता शिक्षकांची मदत घेतली जाते. प्रत्यक्ष मतदान, त्या पूर्वीचे प्रशिक्षण, मतदान मोजणी या कामासाठी शाळा व उच्च माध्यमिक शिक्षकांना पाचारण केले जाते. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिलला मतदान होणार आहे. ‘एप्रिल महिना शाळा परीक्षांचा, उत्तरपत्रिका तपासणी करून निकाल जाहीर करण्याचा असतो. पण, याच महिन्यात शिक्षकांना निवडणुकीच्या कामाकरिता जावे लागणार असल्याने त्याचा परीणाम परीक्षोत्तर कामांवर होण्याची शक्यता आहे. तसा तो होऊ नये म्हणून शाळांनी परीक्षांचे वेळापत्रक थोडे अलीकडे आणले तर उजळणीसाठी कमी वेळ मिळेल. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. म्हणून शाळांनी आत्तापासून नियोजन करून अभ्यासक्रम लवकरात लवकर संपवून जास्तीत जास्त वेळ उजळणीला द्यावा,’ अशी प्रतिक्रिया ‘महामुंबई शिक्षक संस्था संघटने’चे अध्यक्ष प. म. राऊत यांनी दिली.
‘शाळांच्या परीक्षा साधारणपणे १५ एप्रिलपर्यंत संपतात. त्यामुळे, शाळांच्या परीक्षांवर तरी लोकसभा निवडणुकांचा परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र, परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणी, निकाल तयार करणे आदी कामांवर शिक्षकांच्या अनुपस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे,’ अशी भीती ‘मुंबई मुख्याध्यापक संघटने’चे प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केली. या शिवाय एप्रिल महिन्यात अनेक शाळा पुढील वर्षांचे नियोजन करीत असतात. पण, शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे हे नियोजनही या महिन्यात करता येणार नाही, असे रेडीज यांनी स्पष्ट केले.
‘परीक्षेत्तर कामासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध न झाल्यास निकाल लांबू शकतो,’ अशी भीती ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’चे सरचिटणीस अविनाश तांबे यांनी व्यक्त केली. ‘शक्यतो एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात निकाल जाहीर करण्याचा शाळांचा प्रयत्न असतो. पण, यंदा निकाल उशीरा लावावा लागेल,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.
‘सीबीएसई’च्या १२ वीच्या परीक्षांवरही परिणाम
मुंबई : देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (सीबीएसई) आपल्या ९, १०, १२ आणि १७ एप्रिल रोजी होणाऱ्या आपल्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ९ एप्रिलला संगीत, उर्दू इलेक्टीव्ह आणि उर्दू कोअर या विषयांची होणारी परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार २५ एप्रिलला, १० एप्रिलची परीक्षा २१ एप्रिलला, १२ एप्रिलला होणारी परीक्षा १९ एप्रिलला होणार आहे. १७ एप्रिलची परीक्षा २२ एप्रिलला होणार आहे.
मार्च-एप्रिलमध्ये सुट्टय़ाही जास्त
मार्च आणि एप्रिल महिन्यात मिळून सहा सुट्टय़ा असणार आहे. याशिवाय रविवार धरून या महिन्यात तब्बल १३ दिवस बिनकामाचे असणार आहेत. या शिवाय प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे आधीचे दोन दिवस शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ताब्यात घेतला जातो. त्यामुळे, शाळेत महत्त्वाची कामे करणे शक्य होत नाही. या सर्व बाबी गृहीत धरून शाळांनी आधीपासूनच नियोजन करावे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.