शालान्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची तयारी योग्य दिशेने व्हावी आणि त्यांना परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे, याकरता ‘लोकसत्ता’ यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव स्वरूपात ‘यशस्वी भव’ हा उपक्रम सुरू करीत आहे. आज सोमवारपासून या लेखमालेतील मार्गदर्शनपर लेखांना प्रारंभ होईल.
या लेखमालेत समाविष्ट करण्यात आलेल्या लेखांमध्ये पाठय़पुस्तकातील पाठांचा अर्थ, प्रश्नोत्तरे, सरावासाठी उत्तरांसह हॉटस्, बहुपर्यायी प्रश्न आणि सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय सोबतच्या वैशिष्टय़पूर्ण टिपणांचीही विद्यार्थ्यांना मदत होईल. लेखांची मांडणी प्रत्येक विषयाच्या पाठय़पुस्तकानुसार विभागवार करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची तयारी बोर्डाच्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार व्हावी, यावर यंदाच्या लेखमालेत भर दिला जाणार आहे. यासाठी शाळेत ज्या पद्धतीने चाचणी परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा, प्रीलिम परीक्षा घेतली जाते, त्याच पद्धतीने या लेखमालेतही विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत आणि नंतर नेमकी उत्तरे कशी असावीत, हे विद्यार्थ्यांना सुस्पष्ट व्हावे, याकरता आदर्श उत्तरपत्रिकाही दिल्या जातील. वर्षभर सुरू राहणाऱ्या या महत्त्वाकांक्षी लेखमालेत अनुभवी, तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
यात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणितासह सर्व विषयांचे मार्गदर्शन केले जाईल तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि सायन्स आणि भाषाविषयक विषयांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल.
महत्त्वाचा टप्पा
दहावी हा शैक्षणिक कारकिर्दीतील सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दहावीच्या गुणांनुसार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरची दिशा अनेकदा निश्चित होते. याचा ताण शालान्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर असतो. हा ताण निवळावा आणि विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सकारात्मकतेने सामोरे जाता यावे, यासाठी ‘लोकसत्ता’ गेली १७ हून अधिक वर्षे ‘यशस्वी भव’ उपक्रम राबवीत आहे. नव्या स्वरूपातील ‘यशस्वी भव’ लेखमाला यंदाही दहावीच्या विद्यार्थ्यांची या टप्प्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी निश्चितच मदत करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा