कठोर आणि नियमित कष्ट हाच शाश्वत यश मिळविण्याचा मार्ग असून अल्प प्रयत्नांनी मिळालेले फळ फार काळ टिकत नाही. त्यामुळे निवडलेल्या विषयाचा एकचित्ताने अभ्यास करावा असा सल्ला, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी शुक्रवारी येथील टीप-टॉप प्लाझा सभागृहात व्हीआयटी युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि विद्यालंकार प्रायोजित ‘लोकसत्ता मार्ग यशाचा या करिअर मार्गदर्शन शिबिरात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना तरुणांना दिला.
निवडलेल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असताना अनेकदा ठेच लागेल, पडायला होईल. ते स्वाभाविकच आहे. मात्र पडल्यानंतर तुम्ही किती चटकन स्वत:ला सावरता त्यावर तुमची यशस्वीता अवलंबून असते. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. चिकटी आणि चिवटपणाने प्रतिकुलतेवर मात करता येते. भूत आणि भविष्यापेक्षा हाती असणाऱ्या वर्तमानाचा जास्त विचार करा. कारण कोणत्याही चांगल्या कामासाठी आज व आतासारखा उत्तम मुहूर्त नाही, असेही म्हैसकर यांनी सांगितले. त्यानंतरच्या सत्रात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी कोणत्याही पालकांचा मुलांच्या भवितव्याबाबत हेतू वाईट नसतात, पण उपाय चुकीचे असतात असे मत व्यक्त केले. mu04आपल्या मुलांनी चांगल्यात चांगले करिअर निवडावे अशीच प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी त्यांना  चांगल्या ब्रॅन्डेड महाविद्यालयात प्रवेश देण्याचा ते प्रयत्न करतात. मात्र आपली मुले हीच आपल्यासाठी सर्वोत्तम ब्रॅन्ड असतात, हे पालकांनी लक्षात घ्यावे, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले.  यशस्वी होण्यात ज्ञान व निर्णय क्षमतेचा वाटा अवघा २० टक्के व चिकाटी, आशावाद, टीमवर्क व परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यावरच तुमचे ८० टक्के यश अवलंबून असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये ज्ञान मिळते. उर्वरित गुण मुलांच्या अंगी बाणवावे लागतात व त्यासाठी पालकांनी सजगपणे प्रयत्न करावेत, असा सल्ला ‘पाल्याच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका याविषयी बोलताना शिक्षण तज्ज्ञ मिथिला दळवी यांनी दिला.
 पालकांनी मुलांचा उपहास, अपमान करू नये. तसेच त्यांची इतरांशी तुलना अथवा इमोशनल ब्लॅकमेलिंग करणे टाळावे, असेही त्या म्हणाल्या. शिबिराच्या अखेरच्या सत्रात ग्रोथ सेंटरच्या करिअर समुपदेशक मुग्धा शेटय़े आणि स्नेहल महाडिक यांनी दहावी-बारावीनंतर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विविध पदवी अभ्यासक्रमांची ओळख करून दिली.
या तिन्ही विषय शाखांविषयीची बलस्थाने समजून देतानाच त्याविषयी विद्यार्थी-पालकांच्या मनात असणारे गैरसमजही त्यांनी दूर  केले. शिबिरात मुख्य सत्रांदरम्यान व्हीआयटी युनिव्‍‌र्हसिटीचे प्रा. अमित महिंद्रकर, संकल्पचे संतोष रोकडे, विद्यालंकारचे हितेश मोघे, एस.पी.क्लासेसचे प्रा. सुभाष जोशी, स्टडी सर्कलच्या अपूर्वा वैद्य आणि आयडियल क्लासेसचे आशिष चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. आयडिअल एज्युकेशन, सीआयएमए, पथिक, रेझोनन्स, एस.पी.क्लासेस, सिन्हाल आयआयटी, स्टीडी सर्कल, संकल्प आणि टीप-टॉप प्लाझा या शिबिराचे सह प्रायोजक होते. ‘लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक तर करिअर वृत्तान्त पुरवणीच्या समन्वयक सु्चिता देशपांडे यांनी सूत्र संचालन केले.  

Story img Loader