‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) गव्हर्निग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात पहिल्यांदाच मराठी चित्रपटकर्मीनी एकत्र येऊन आपला निषेध नोंदवला आहे. गेले दोन महिने एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. तरीही सरकारकडून हा वाद मिटवण्याच्या दृष्टीने काहीही प्रयत्न केले जात नाहीत हे पाहून अस्वस्थ झालेल्या मराठी चित्रपटकर्मीनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपला निषेध व्यक्त केला. याप्रकरणी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती अभियान राबवून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठबळ देण्याचा आपला इरादाही त्यांनी या वेळी स्पष्ट केला.
‘एफटीआयआय’च्या गव्हर्निग कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी गुलजार, विधू विनोद चोप्रा यांसारख्या समर्थ चित्रपटकर्मीची नावे असतानाही त्यांना डावलून गजेंद्र चौहान यांच्या हातात सूत्रे सोपवणे निषेधार्ह असल्याचे मत स्वत: ‘एफ टीआयआय’मधून दिग्दर्शनाचे धडे गिरवलेल्या उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. उमेश कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव, दिग्दर्शक अभिजित पानसे, ‘किल्ला’ फेम दिग्दर्शक अविनाश अरुण आणि अभिनेता-लेखक, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ‘चौहान यांची नियुक्ती ही दुर्दैवी बाब होती. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर तरी सरकार निर्णय मागे घेईल असे वाटले होते. आता यावर काही ठोस भूमिका घेणे गरजेचे वाटले’, असे उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात मोठय़ा प्रमाणावर अभियान उभारण्यासाठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी पुढाकार घेतला असून ते त्यासाठी खास मोहीम राबविणार आहेत. चौहान यांच्या नियुक्तीच्या निर्णयाचे समर्थन करण्यापूर्वी या संस्थेची प्रतिष्ठा, आजवर घडवलेले विद्यार्थी यांचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता, असे मत अभिजित पानसे यांनी नोंदवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा