गेली दोन वष्रे येणार येणार म्हणून सांगितले जाणारे ‘युवकभारती’चे उपयोजित मराठी हे पुस्तक अखेर यंदा रुजू झाले आहे. हे पुस्तक वेगवेगळ्या कारणांसाठी टीकेचा विषय बनले आहे. या पाठय़पुस्तकाला त्यातील त्रुटींमुळेच शिक्षकांचा विरोध असेल तर तो वाजवी आहे. पण, उच्च माध्यमिक स्तरावर मराठी विषयाचे स्वरूप पारंपरिकच असायला हवे असा जर कोणाचा आग्रह असेल तर तो बरोबर नाही..
उच्च माध्यमिक स्तरावर मराठी विषय विवाद्य होण्याची परंपरा तशी जुनी आहे. मराठीला माहिती-तंत्रज्ञानासारख्या विजातीय विषयाचा पर्याय देणे असो की अगदी अलीकडे आलेले इयत्ता अकरावीचे ‘उपयोजित मराठी’चे पाठय़पुस्तक असो, मराठी विषय सतत चच्रेत राहिलेला आहे. गेली दोन वष्रे येणार येणार म्हणून सांगितले जाणारे ‘युवकभारती’चे उपयोजित मराठी हे पुस्तक अखेर यंदा रुजू झाले आहे. हे पुस्तक वेगवेगळ्या कारणांसाठी टीकेचा विषय बनले आहे. हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी स्वत: पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या काही कार्यशाळांतून पाठय़पुस्तकाच्या स्वरूपाविषयी व दर्जाविषयी स्वागत आणि तीव्र टीका अशा संमिश्र (आणि संतप्तही) प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. असे असताना पाठय़पुस्तक मंडळ मात्र मौन पाळून आहे.
या पुस्तकाला होणारा विरोध एका बाजूने तात्त्विक किंवा धोरणात्मक आहे तर दुसऱ्या बाजूने त्याच्या गुणवत्तेवर आक्षेप नोंदविला जात आहे. सुरुवातीलाच हे कबूल करायला हवे की हे पुस्तक गुणवत्तेच्या निकषांवर उतरणारे नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. त्याची काही कारणे पाठय़पुस्तक निर्मितीच्या सदोष प्रक्रियेशी व प्रशासकीय हलगर्जीपणाशीही संबंधित आहेत. उच्च माध्यमिक स्तरावर आजवर गद्य-पद्य वेचे असलेले अर्थात मराठी साहित्याला प्राधान्य असलेले पाठय़पुस्तक अभ्यासाला असे. ते तयार करताना प्राय: वेच्यांची निवड व संपादन करणे एवढीच जबाबदारी संपादक मंडळावर असे. शिवाय अशा पाठय़पुस्तक निर्मितीची परंपराही दीर्घ आहे. उपयोजित मराठीचे तसे नाही. एक तर हे पाठय़पुस्तक वेच्यांच्या निवडीपेक्षा स्वतंत्र लेखनातून तयार झालेले आहे आणि दुसरे म्हणजे आजही या विषयाकडे मराठीचे अनेक प्राध्यापक साहित्यबाह्य़ विषय म्हणून नकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहेत. सुमारे दोन-तीन दशकांपूर्वी डॉ. स. गं. मालशे, डॉ. विलास खोले, प्रा. वि. शं. चौघुले आदींनी समयोचित व दूरदृष्टी ठेवून ना. दा. ठाकरसी विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात जेव्हा व्यावहारिक मराठीच्या काही घटकविषयांची रुजुवात केली तेव्हाही त्यावर टीका झाली होती. त्यानंतर अनेक विद्यापीठांनी या विषयाचा मराठीच्या अभ्यासक्रमांत अंतर्भाव करायला सुरुवात केली व त्या अनुषंगाने काही अभ्याससामग्रीही उपलब्ध झाली. परंतु, आजही हा विषय मराठीचे अनेक प्राध्यापक मन:पूर्वक स्वीकारायला राजी नाहीत हे इयत्ता अकरावीच्या उपयोजित मराठी या पाठ्यपुस्तकावर ज्या पद्धतीने हल्ला होत आहे त्यावरून लक्षात येते.
वास्तविक पाहता या पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेले पत्रलेखन, सारांशलेखन, आकलन, भाषांतर, वृत्तलेखन, जाहिरातलेखन हे विषय मराठीच्या अभ्यासक्रमात याआधीही होते. भाषेचे वाड्मयीन उपयोजन, सूत्रसंचालन, सादरीकरण, संगणकाची भाषा, कोशवाड्मय हे विषय मात्र प्रथमच अभ्यासक्रमात आलेले आहेत. तरीही ते वादग्रस्त ठरले आहे. त्याचे कारण या पुस्तकाचा अपेक्षाभंग करणारा दर्जा हेच एकमेव असेल असे वाटत नाही. हे पुस्तक लेखनदृष्टय़ा दर्जेदार असते तरीही त्यावर टीका झालीच असती कारण या पुस्तकात मराठीच्या पारंपरिक पाठय़पुस्तकांप्रमाणे साहित्याच्या अभ्यासाला फारसा वाव नाही.
त्यामुळेच उपयोजित मराठीच्या विद्यमान पाठय़पुस्तकात साहित्याचे आणखी काही पाठ अंतर्भूत करून ते सुधारित स्वरूपात अभ्यासाला लावावे येथपासून ते समूळ रद्दच करावे येथपर्यंत काही शिक्षकांच्या मागण्या पुढे येत आहेत. याबाबतचा निर्णय अर्थातच पाठय़पुस्तक मंडळाने घ्यायचा आहे. या वादाच्या निमित्ताने पाठय़पुस्तक मंडळाला काही सूचना मात्र अवश्य कराव्याशा वाटतात .
१) उपयोजित मराठीबाबतचे सध्याचे संभ्रमाचे व गोंधळाचे वातावरण दूर करण्यासाठी हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ज्ञानरचनावाद, गाभा घटक व राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा या संदर्भातील पाठय़पुस्तकाची प्रस्तुतता, पूरक अध्यापनसामग्री, मूल्यांकनपद्धती यांविषयीची मार्गदर्शनपर पुस्तिका त्वरित उपलब्ध करून द्यावी.
२) साहित्यलक्ष्यी मराठीकडून उपयोजित मराठीकडे हा काटकोनात झालेला बदल आहे हे लक्षात घेऊन शिक्षकांसाठी विभागवार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे.
३) सदर पाठय़पुस्तकाचे तज्ज्ञांकरवी पुनर्परीक्षण करून घ्यावे व त्यांनी लक्षात आणून दिलेल्या त्रुटी दूर करून पुस्तकाची सुधारित आवृत्ती उपलब्ध करून द्यावी.
४) उपयोजित मराठीचे व्यवहारसापेक्ष स्वरूप लक्षात घेता या विषयावर कोणी कितीही उत्तम दर्जाचे पाठय़पुस्तक तयार केले तरी ते ठरावीक अंतराने अद्ययावत करावे लागणार आहे. अशा स्थितीत पाठय़पुस्तक मंडळाने १०-१५ वर्षांनंतर मराठीचे पाठय़पुस्तक बदलण्याचे आपले धोरण तरी बदलावे किंवा भाषेतर विषयांच्या पाठय़पुस्तकांप्रमाणे मराठीचे पाठय़पुस्तक तयार करण्याची स्वत:ची मक्तेदारी मोडीत काढून खासगी लेखक-प्रकाशकांसाठी हे क्षेत्र खुले करावे. अभ्यासक्रम व मूल्यांकनपद्धती एवढय़ाच गोष्टी स्वत:च्या अखत्यारीत ठेवून उपयोजित मराठीच्या चांगल्या पुस्तकांना मान्यता द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक चांगली पुस्तके उपलब्ध होऊ शकतील.
५) मराठी साहित्य हा विषय ऐच्छिक ठेवून तो संपवण्यापेक्षा द्वितीय भाषांतर्गत अनिवार्य गटातच उपयोजित मराठीला पर्याय म्हणून ठेवता येईल का याचाही गांभीर्याने विचार करावा. म्हणजे विद्यार्थ्यांना एकाच विषयांतर्गत मराठी साहित्य किंवा उपयोजित मराठी यांपकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य राहील. यामुळे जिथे विद्यार्थ्यांची एकच तुकडी आहे तिथे शिक्षकांचा कार्यभार वाढला तरी हरकत नाही. उलट त्यामुळे आजवर शिक्षण खात्याकडून मराठीवर झालेल्या अन्यायाचे अंशत: का होईना परिमार्जन होईल.
या पाठय़पुस्तकाला त्यातील त्रुटींमुळेच शिक्षकांचा विरोध असेल तर तो वाजवी आहे. पण, उच्च माध्यमिक स्तरावर मराठी विषयाचे स्वरूप पारंपरिकच असायला हवे असा जर कोणाचा आग्रह असेल तर तो बरोबर नाही. ज्ञानरचनावाद, गाभा घटक आणि मूल्यसंस्कार यांच्याशी हे पुस्तक पूर्णपणे फारकत घेणारे आहे हा आक्षेपही पटण्यासारखा नाही. उपयोजित मराठी या विषयाचे स्वरूपच विद्यार्थी हा केंद्रिबदू मानून प्रात्यक्षिकाला, सर्जनशीलतेला महत्त्व देणारे आहे. पाठय़पुस्तकातील घटक विषयांच्या मांडणीतून ते परिणामकारकपणे जाणवत नाही ही या पाठय़पुस्तकाची मर्यादा आहे, उपयोजित मराठी या विषयाची नव्हे. इंग्रजी हा विषय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर अनिवार्य आहे आणि संज्ञापन कौशल्ये, व्यवसाय संज्ञापन, माहिती तंत्रज्ञान आदी साहित्येतर विषयांचे स्वतंत्र अभ्यासक्रम वर्षांनुवष्रे इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. मराठीसाठी ही भूमी अद्याप नांगरायची आहे. त्यासाठी या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. उच्च माध्यमिक स्तरावर मराठी हा विषय इंग्रजीप्रमाणे अनिवार्य नाही की मराठी ही उच्च व व्यावसायिक शिक्षणाची माध्यमभाषा नाही. त्यामुळे मराठीमध्ये अभ्यासक्रमाच्या विस्ताराला मर्यादा पडतात.
मराठीच्या अभ्यासक्रमांत साहित्यलक्ष्यी मराठी आणि उपयोजित मराठी हे विषय परस्परांचे शत्रू न मानता ते दोन्ही विषय विद्यार्थ्यांना कसे उपलब्ध करून देता येतील हे पाहिले पाहिजे. अन्यथा मराठी ही केवळ साहित्याची व मूल्यसंस्काराची भाषा आहे आणि ज्यांना व्यवसाय, रोजगार, अर्थार्जन, उपजीविका वगरे क्षुद्र व्यवहारांत रस आहे त्यांनी इंग्रजीकडे वळावे असा संदेश जाईल. तो मराठीचे विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा व समाज यांपकी कोणाच्याच हिताचा नाही.