वडील मुख्याध्यापक असल्याने दहावीचा इतिहासाचा पेपर सोडवायला बसलेल्या विद्यार्थ्यांला वडिलांच्या सहकाऱ्यांनी पेपर सोडवायला मदत केल्याची घटना सुधागड एज्युकेशन विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रात मंगळवारी खोली क्रमांक ५१ मध्ये घडली.
पेपर सुरू झाल्यापासून अनेक शिक्षकांचा वावर येथे होत असल्याचे या ब्लॉकमधील परीक्षार्थीनी व शिक्षकांनी प्रसारमाध्यमांना फोन करून कळवले. त्यानंतर हा प्रकार गटशिक्षणाधिकारी साबळे यांच्या कानावर पडल्यावर त्यांनीही भरारी पथकासह केंद्रावर धाव घेतली. तोपर्यंत एक तासाचा पेपर लिहून झाला होता.प्रसारमाध्यामांनी संपर्क साधल्यामुळे या भरारी पथकाने संपूर्ण केंद्र तपासल्याचे गटशिक्षणाधिकारी सांगतात. त्या वेळी एका विद्यार्थ्यांला कॉपी करताना पकडण्यात आले. मात्र हा फक्त देखावा असल्याचेही येथील इतर शिक्षक सांगतात. या केंद्रावरील परीक्षार्थीनी व शिक्षकांनी दिलेली माहिती काही निराळीच होती. मुख्याध्यापक इनामदार यांच्या मुलाला दहावीचा पेपर सोपा जावा म्हणून केंद्रप्रमुखापासून ते साहाय्यक केंद्रप्रमुखासह पर्यवेक्षक या मुलाच्या दिमतीला हजर असल्याचे येथील शिक्षकांनी व परीक्षार्थीनी सांगितले. विद्यार्थ्यांला प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी व इतर मदतीसाठी या मुलांचा वावर या वर्गात सातत्याने होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र केंद्र ही त्यांचे व शिक्षकही तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न या वेळी इतर मुलांना पडला. या केंद्राचे प्रमुख प्रदीप पिंगळे, साहाय्यक केंद्रप्रमुख सुरेश शिंदे, तसेच डी. आर. दीक्षित व छाया विजयापुरे या शिक्षिकांची नावे काही जागरूक शिक्षकांनीच नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर उजेडात आणली. शिक्षण मंडळाच्या नियमाप्रमाणे संबंधित पाल्याचे वडील मुख्याध्यापक असून वडील काम करत असलेल्या शाळेत त्या मुलांचे परीक्षाकेंद्र आल्यास परीक्षा सुरू झाल्यापासून ते संबंधित केंद्रात उपस्थित राहू शकत नाही, मात्र या नियमाला कळंबोलीमध्ये हारताळ फासत संबंधित मुख्याध्यापक या केंद्रातच उपस्थित राहिले. याबाबत शिक्षण विभागाने सारवासारवाची भूमिका घेतली आहे. गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. तसे रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी बापू सोनावणे यांना सांगितले. परीक्षामंडळाचे सदस्य असलेले संबंधित मुख्याध्यापक आपल्या मुलाला सोडायला येऊ शकतात, असा युक्तिवाद खुद्द सोनावणे मुख्याध्यापकांच्या बाजूने केला. परीक्षा सुरू असताना शाळेचे प्रवेशद्वारावर कुलूप लावण्याची प्रथा शिक्षण विभागाने बंद केली असली तरीही या नियमाचे उल्लंघन सुधागड विद्यालयाच्या केंद्रावर झाले.
मुख्याध्यापकाच्या मुलाला दहावीची परीक्षा सोपी?
वडील मुख्याध्यापक असल्याने दहावीचा इतिहासाचा पेपर सोडवायला बसलेल्या विद्यार्थ्यांला वडिलांच्या सहकाऱ्यांनी पेपर सोडवायला मदत केल्याची ...
First published on: 20-03-2015 at 12:59 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matriculation exam easy to principal son