नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  लातूर येथील केंद्रावर  एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांचा इएनटी विषयाचा पेपर फुटला.
या ४० गुणांच्या प्रश्नपत्रिकेमधील ३० गुणांच्या प्रश्नांची उत्तरे सकाळीच मोबाइलवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षी नागपूर येथे एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांचा पेपर फुटल्यानंतर विद्यापीठाने प्रश्नपत्रिका कुलुपबंद ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र यावर्षी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हातात वेळेपूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याने हे उपाय तुटपुंजे असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र पेपरफुटी झालीच नाही, असे आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सांगितले जात आहे.
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी कान, नाक, घसा (ईएनटी) या विषयाचा पेपर होता. या पेपरमध्ये अ, ब व क असे तीन विभाग असतात. त्यातील ब आणि क या विभागातील प्रश्न व त्यांचे गुण यांची माहिती देणारा संदेश काही विद्यार्थ्यांना आला. मात्र असा कोणताही गैरप्रकार झाल्याचे आढळलेले नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक वाजता व संध्याकाळी सात वाजता आढावा घेतला जातो. यासंबंधी चर्चा सुरू झाल्यावर शनिवारी आरोग्य विज्ञान विद्यापीठात बैठक बोलावण्यात आली. गैरप्रकार झाल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. आम्ही पोलिसांत देऊ, मात्र गैरप्रकार झाल्याचे उघड झाले नाही तर पुन्हा परीक्षा घेता येणार नाही, असे कुलगुरू डॉ. अरूण जामकर म्हणाले.