पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्यास अद्याप अवकाश असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स’ (एमसीए) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आणखी आठ ते दहा दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
एमसीएसाठी बीसीए, बीएस्सी-आयटी, बीएस्सी-कम्प्युटर सायन्स, बीए/बीकॉम-गणित आदी पदवी घेतलेले विद्यार्थी प्रवेश घेतात. पण, पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्याआधीच एमसीए या पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्याने विद्यार्थी हवालदील झाले होते. कारण, पदवीचा निकाल जाहीर होण्याआधीच विद्यार्थ्यांना एससीएसाठी लाखो रुपयांचे शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा लागणार होता. पैसे मोजून पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला पण पदवी परीक्षेत दांडी उडाली तर हजारो रुपये पाण्यात जाणार आणि या भीतीने प्रवेश निश्चित नाही केला तर मिळालेली जागा हातची जाणार, या ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा कोंडीत विद्यार्थी सापडले होते.
 लोकसत्ताने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात आणून दिल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने एमसीएचे प्रवेशाचे वेळापत्रक आणखी ८ ते १० दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader