‘बीएस्सी-आयटी’ किंवा ‘बीएस्सी-संगणकशास्त्र’ या विषयातील पदवीधरांना थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे यंदा ‘मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन’ (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांच्या तब्बल ७४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने जागा रिक्त राहणारा एमसीए हा एकमेव व्यावसायिक अभ्यासक्रम आहे.
एमसीए हा तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. बीएस्सीबरोबरच गणित घेऊन बीए वा बीकॉम केलेल्या पदवीधरांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमाच्या राज्यभरात तब्बल १३,३८५ जागा आहेत. एमसीए केल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध होत असल्याने पदवीनंतर एमसीएला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना तीन वर्षे हा विषय अभ्यासावा लागत होता. पण, या वर्षी माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र या विषयातून बीएस्सी केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश देण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ने  (एआयसीटीई) घेतला.
या दोन विषयांतील विद्यार्थ्यांचा इतर विषयांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत संगणकशास्त्र या विषयाचा पाया पक्का असतो, असा युक्तिवाद ही योजना राबविताना केला गेला. एमसीएला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्रात बीएस्सी केलेले विद्यार्थीच सर्वाधिक संख्येने असतात. त्यात या विषयाच्या पदवीधरांना थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश देण्यात आल्याने त्याला प्रतिसाद न लाभता तरच नवल. पण, यामुळे एमसीच्या पहिल्या वर्षांच्या तब्बल ७४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षी जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अवघे ३० टक्के होते.
एखाद्या विषयाच्या इतक्या मोठय़ा संख्येने जागा रिक्त राहण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. दुसरीकडे एमसीएच्या थेट दुसऱ्या वर्षांच्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या ७ हजार ९४२ जागांपैकी केवळ २ हजार ४९९ जागाच रिक्त राहिल्या आहेत. म्हणजे एकाच महाविद्यालयात एमसीएचे पहिल्या वर्षांचे वर्ग विद्यार्थ्यांविना ओस पडलेले असतील, तर दुसरीकडे दुसऱ्या वर्षांचे वर्ग विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहात असतील. थेट प्रवेश योजनेला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे संस्थाचालकही एआयसीटीईकडे दुसऱ्या वर्षांच्या थेट प्रवेश योजनेसाठी जागा वाढवून मागू लागले आहेत.