सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच आखून दिलेल्या सुधारित वेळापत्रकामुळे यंदा राज्यातील सरकारी एमबीबीएस व बीडीएस महाविद्यालयांचे प्रवेश गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे एक महिना लवकर होणार आहेत. परंतु, प्रवेश लवकर होऊनही २०१४-१५ हे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरला सुरू करण्याच्या बंधनामुळे यंदा राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये एक महिना उशीराने सुरू होण्याची शक्यता आहे.
‘लिपीका गुप्ता विरूध्द केंद्र सरकार’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १९ मे रोजी दिलेल्या आदेशात सरकारी महाविद्यालयातील राज्य व अखिल भारतीय कोटय़ातील (ऑल इंडिया) जागांच्या प्रवेशांकरिता सुधारित वेळापत्रक आखून दिले आहे. न्यायालयाने या आधी मार्चमध्ये झालेल्या एका निकालात पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता वेळापत्रक ठरवून दिले होते. पण, आता न्यायालयाने वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांकरिताही प्रवेशाचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. या निकालानुसार राज्यांनी आपापल्या प्रवेश परीक्षेचा निकाल ५ जूनच्या आत जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘फार्मसी’च्या विद्यार्थ्यांना दिलासा
वैद्यकीयच्या एमबीबीएस-बीडीएस या अभ्यासक्रमांचे प्रवेश एक महिना लवकर होणार असल्याने त्याचा फायदा औषधनिर्माण (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना होणार आहे. अनेकदा वैद्यकीय व औषधनिर्माण अभ्यासक्रमाचे प्रवेशेच्छुक विद्यार्थी सारखेच असतात. राज्याची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तीन-चार महिने लांबते. तोपर्यंत औषधनिर्माण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत उरकली जाते. वैद्यकीयला मनोजोग्या महाविद्यालयात प्रवेश मिळेलच याची खात्री नसल्याने बरेच विद्यार्थी औषधनिर्माण अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ठेवतात. वैद्यकीयला प्रवेश मिळाल्यानंतर हा प्रवेश रद्द केला जातो. दरम्यान, औषधनिर्माण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपलेली असल्याने जागा रिक्त होऊनही इतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळत नाही. त्यामुळे, वैद्यकीयची प्रवेश प्रक्रिया लवकर संपवावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असते.