राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, तसेच महाविद्यालयातील पायाभूत सुविधा व अध्यापकांची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी अचानक तपासणी करण्याचा निर्णय नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला. ही संकल्पना प्रथमच राबविण्यात येत असून यात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका घेत विद्यार्थ्यांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा, तसेच संबंधित महाविद्यालयांच्या वरिष्ठांशी बोलून ते सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार काही महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञांची समिती गेली असता त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानीय चौकशीच्या माध्यमातून आलेल्या अहवालात जवळपास सत्तर टक्के महाविद्यालयांत त्रुटी असल्याचे आढळून आल्याचे कुलगुरू म्हणाले. या रिपोर्टनंतर संबंधित महाविद्यालयांना सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळही देण्यात आला. याशिवाय अचानक तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती पाठविण्यात आली. काही महाविद्यालयांत त्रुटी आढळल्या; तथापि वैद्यकीय महाविद्यालये बंद करणे हे विद्यापीठाचे धोरण नसल्याने सातत्याने पाठपुरावा करून सुधारणा करण्यास भाग पाडले जाते, असे डॉ. जामकर म्हणाले.
राज्यात सध्या आधुनिक वैद्यकाची ३९ महाविद्यालये, ३० डेंटल, ६० आयुर्वेदिक आणि १०० नर्सिग कॉलेजेस आहेत. या सर्व ठिकाणी पायाभूत सुविधा, शिक्षक तसेच शिक्षणाच्या दर्जाची नेमकी काय परिस्थिती आहे हेही ही समिती जाणून घेणार आहे. विद्यापीठाच्या स्थानीय चौकशी समितीव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी डॉ. जामकर यांच्या पुढाकाराने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. काही खासगी महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे रिक्त असूनही ती दाखविण्यात येत नाहीत. अचानक तपासणीमुळे नेमके शिक्षक किती, तसेच विद्यार्थ्यांशी थेट केलेल्या संवादामधून महाविद्यालयाची नेमकी स्थिती स्पष्ट होते.

Story img Loader