परीक्षेतले घोळ आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारे मनस्ताप किती प्रकारचे असतात, याचा प्रात्यक्षिक अनुभव देण्यासाठीची चढाओढच जणू आपल्याकडील परीक्षा मंडळांमध्ये लागली आहे की अशी शंका घ्यायला जागा आहे. या वेळचे गोंधळी आहेत, ‘शिक्षक पात्रता चाचणी’च्या (टीईटी) आयोजनाची व निकालाची जबाबदारी पेलणारी ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद’. परिषदेने आपल्या सुधारित उत्तरसूचीतच चुका करून ठेवल्याने पहिली ते सातवीच्या वर्गावर शिक्षक म्हणून हजेरी लावू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांवर हक्काचे गुण गमावण्याची वेळ आली आहे.
टीईटीचे हे पहिलेच वर्ष आहे. या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी म्हणजे चार ते सहा टक्के इतका लागला आहे. हे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे, ज्यांची संधी एक किंवा दोन गुणांनी हुकली असेल, त्यांच्यासाठी हा घोळ तोंडाजवळ आलेला घास काढून घेणारा ठरला आहे.
मूल्यांकन सदोष होऊ नये म्हणून परीक्षा झाल्यानंतर आठवडाभरातच प्रश्नांची उत्तरे संभाव्य उत्तरसूचीद्वारे जाहीर करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे परिषदेनेही १५ डिसेंबरला टीईटी झाल्यानंतर आठवडाभरात त्याची संभाव्य उत्तरसूची जाहीर केली. यात जे प्रश्न चुकीचे होते किंवा ज्यांची उत्तरे चुकीची होती त्यावर उमेदवारांनी आक्षेप उपस्थित करायचे असतात. परीक्षार्थीकडून सूचना आल्यानंतर सुधारणा करून अंतिम उत्तरसूची जाहीर केली जाते. त्याप्रमाणे टीईटीने अंतिम उत्तरसूची जाहीर केली. या अंतिम उत्तरसूचीप्रमाणे उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर केला जातो. पण, परिषदेने या अंतिम उत्तरसूचीतील काही प्रश्नांची उत्तरे जी आधीच्या संभाव्य सूची योग्य होती तीच चुकवून ठेवली आहेत.
उदाहरणार्थ मराठी माध्यमाच्या समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्न क्रमांक ११८मध्ये ‘मिलिंदने वयाची १३ वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठीचे पर्याय होते, १)३वर्षे, २)८वर्षे, ३)५वर्षे, ४)६वर्षे. या प्रश्नाचे उत्तर संभाव्य उत्तरसूचीत पर्याय क्रमांक ३)५वर्षे असे देण्यात आले आहे, की जे योग्यही होते. जानेवारी, २०१४च्या अंतिम उत्तरसूचीत ११८ या प्रश्नाचा काहीच उल्लेख नव्हता. मात्र, १७ मार्च, २०१४ला निकालासोबत आलेल्या उत्तरसूचीमध्ये (ज्यावरून निकाल निश्चित केला आहे) त्यात या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय ३) ऐवजी चक्क चुकीचा म्हणजे २)८वर्षे असा देण्यात आला आहे.
या प्रश्नाचे स्वरूप पाहता उत्तर तुलनेत सोपे आहे. त्यामुळे, हजारो उमेदवारांनी योग्य उत्तर देऊनही त्यांना गुण गमवावे लागले आहेत. इतरही प्रश्नांबाबत या प्रकारचा गोंधळ झाला असावा, अशी शक्यता परिषदेतील सूत्रांनी वर्तवली. कारण, ७ मार्चला परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर २०० हून अधिक परीक्षार्थीचे आक्षेप घेणारे ई-मेल परिषदेच्या पत्त्यावर आले आहेत. त्यावरून या गोंधळाचे गांभीर्य लक्षात येईल. परिषदेने २२ मार्चपर्यंत निकालासंबंधात असलेले आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत दिली आहे. तोपर्यंत या तक्रारीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

चूक झाली आहे
अंतिम उत्तरसूचीत चूक झाली आहे. ज्या उमेदवारांना या संबंधात आक्षेप नोंदवायचे असतील त्यांनी ते २२ मार्चपर्यंत नोंदवावे. त्यांचे आक्षेप तपासून सुधारित निकाल जाहीर केला जाईल.
– डी. डी. सहस्त्रबुध्दे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

Story img Loader