थकित वेतन, सेट-नेटबाधित शिक्षकांची प्रलंबित समस्या अशा प्रश्नांवरून ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्र्हसिटी अॅण्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन’ (एमफुक्टो) या राज्यव्यापी प्राध्यापक संघटनेने १५ डिसेंबरपासून बेमुदत ‘काम बंद’चा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून या संघटनेशी संलग्न असलेल्या ‘बॉम्बे युनिव्र्हसिटी अॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’ (बुक्टू) या संघटनेतर्फे सोमवार २४नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या फोर्ट येथील आवारात दुपारी २ वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत.
‘एमफुक्टो’च्या प्रतिनिधींची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच भेट घेऊन या प्रश्नांवर चर्चा केली. या आधी भाजप हा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असताना तावडे यांनी एमफुक्टोच्या प्रतिनिधींची आझाद मैदानात आंदोलनस्थळी भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. तसेच, सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासनही दिले होते. गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीतही तावडे यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका एमफुक्टोने घेतली आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या कार्यालयांबाहेर धरणे आंदोलन करून शिक्षक मंडळी निवेदन देणार आहेत. त्यानंतर १ डिसेंबरला आझाद मैदानात राज्यव्यापी निदर्शने केली जातील. तर ८ डिसेंबरला एक दिवसाचे रजा आंदोलन करून प्राध्यापक आपला असंतोष व्यक्त करतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १५ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ‘एमफुक्टो’ने दिला.
जून, २०१४ पासून ‘एमफुक्टो’चे आंदोलन सुरू आहे. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकांमुळे आंदोलनाला स्थागिती देण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा