मो यांची जगाला परिचित असलेली साहित्यकृती म्हणजे ‘रेड सोरघम.’ १९८७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीचे कथानक एका लहानशा खेडय़ात घडते. प्रेमकथा आणि शेतमजुरांचा जीवनसंघर्ष यांचे चित्रण जपानविरोधी युद्धाच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आले आहे. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना ज्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले त्याची अनुभूती त्यातून मिळते. या कादंबरीवर काढण्यात आलेल्या याच नावाच्या चित्रपटाला १९८८च्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे मो यांचे नाव चीनबाहेर पोचले होते. त्यांच्या साहित्याने चीनच्या पारंपरिक साहित्यापासून आणि मौखिक परंपरेपासून फारकत घेतलेली दिसते.  
वास्तव आणि कल्पनारम्यता, इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालत मो आपल्या शैलीने एक वेगळे जग निर्माण करतात. ‘बिग ब्रेस्टस अँड वाइड हिप्स’, ‘दी रिपब्लिक ऑफ वाइन’ ही त्यांची गाजलेली इतर पुस्तके. भ्रममय वास्तववादाने युक्त असे त्यांचे लिखाण विल्यम फोकनर आणि गॅब्रिएल गार्शिया माक्र्वेझ यांच्या कादंबऱ्यांची आठवण करून देते.
मो हे साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले चिनी नागरिक असले तरी ते हा पुरस्कार मिळविणारे पहिले चिनी लेखक मात्र नव्हेत. फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेल्या गाओ झिनगिझान याला २००० मध्ये त्याच्या ‘सोल माऊंटन’ या कादंबरीसह इतर लिखाणाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला होता. गाओच्या लिखाणात चीनमधील कम्युनिस्ट सरकारवर टीका करण्यात आली आहे. त्याच्या साहित्यावर चीनमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यावेळच्या चिनी सत्ताधाऱ्यांनी त्याच्या पुरस्काराला मान्यता दिली नाही.
मो यांच्या पुरस्काराबाबत असे काही वादंग निर्माण होणार नाही, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. मो यांना नोबेल पुरस्काराबद्दल कळविण्यात आले तेव्हा त्यांना अतिशय आनंद वाटला आणि भीतीही वाटली. चीनच्या राज्यकर्त्यांची या पुरस्काराबद्दलची भूमिका स्पष्ट झालेली नाही. मो यान हे चीनमधील अतिशय प्रसिद्ध, बंदीचा सामना करावा न लागलेले लेखक मानण्यात येतात. त्यांच्या लिखाणाची नक्कल चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात झालेली दिसते. ते सत्ताधाऱ्यांच्या अतिशय नजीकच्या वर्तुळात असतात, अशी टीकाही करण्यात येते. चीनमध्ये एखाद्या लेखकाची सरकारबाबत काय भूमिका आहे ही बाब महत्त्वपूर्ण मानली जाते.    
र्निबध सहित्यासाठी उपकारकच!
र्निबध टाळण्यासाठी मी भ्रममय वास्तववादाचा हुकमी हत्यारासारखा वापर केला. आपल्या जीवनातील काही संवेदनशील विषयांना आपण थेट स्पर्श करू शकत नाही. अशा वेळी लेखक स्वतची कल्पनाशक्ती वापरून असे विषय वास्तवापासून वेगळे करून मांडू शकतो, तसेच अतिशयोक्तीचाही आधार घेऊ शकतो. त्याने केलेले चित्रण धिटाईचे, चित्रदर्शी आणि खऱ्याखुऱ्या जगाचे सूचन करणारे मात्र असले पाहिजे. र्निबध साहित्यासाठी उपकारकच ठरतात, असे मला वाटते या शब्दांत त्यांनी सरकारी र्निबधांबाबत आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा