मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेत १९९१ साली जी संरचनात्मक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली त्याला २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात नव्या आर्थिक धोरणाचे समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांवर परिणाम झाल्याचे दिसून येते. या काळात देशाची प्रगती झाली, हे निश्चितच पण याचबरोबर गुंतागुंतीचे नवीन प्रश्न हे सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनात उभे राहिल्याचे दिसून येते. या सर्वाचा परिणाम प्रशासनावरही होत असतो. लोकशाही व्यवस्थेत प्रशासन (administration) व अंमलबजावणी यंत्रणा म्हणजेच नोकरशाही ((Bureaucracy) महत्त्वाची ठरते.
भारतात केंद्रीय पातळीवर संघ लोकसेवा आयोग व राज्य पातळीवर राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रशासनातील विविध महत्त्वाच्या पदांसाठीच्या निवड परीक्षा घेतल्या जातात. वर चर्चिलेल्या बदलांचा परिणाम या परीक्षांच्या अभ्यासक्रम व स्वरूपावर प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते. नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्वपरीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम जाहीर केला आहे. ७ एप्रिल २०१३ रोजी होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा या नवीन अभ्यासक्रमावर आधारित असेल. यापूर्वी १० जून २०१२ रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप या बदलाची नांदी ठरते.
कारण ही पूर्वपरीक्षा जरी जुन्या अभ्यासक्रमावर आधारित होती तरी विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप पूर्णत: भिन्न होते. शिवाय मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमही बदललेला होता. मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ करण्यात आली होती. परंतु मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर हे लेखी स्वरूपाचे होते. या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची पूर्वतयारी कशा प्रकारे करावी हा या लेखाचा विषय आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययन-१ व पेपर- २ हे प्रत्येकी २०० गुणांचे पेपर्स आहेत. या प्रश्नपत्रिकांसाठी दोन तासांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. परंतु दोन्ही प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांची संख्या जाहीर केलेली नाही. हे प्रश्न पूर्वीप्रमाणेच बहुपर्यायी असतील व गुणपद्धती ऋणात्मक असेल.
संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रभावाचा विचार करता प्रश्नपत्रिका-१ मध्ये १०० प्रश्न तर प्रश्नपत्रिका-२ मध्ये ८० किंवा १०० प्रश्न असण्याची दाट शक्यता आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमानुसार पेपर-१ मध्ये चालू घडामोडी या घटकाचा उल्लेख केला आहे. २०१२ च्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप पाहता आपल्याला या घटकाचे महत्त्व निश्चितच जाणवेल. साधारणत: एक ते दीड वर्षांच्या कालावधीत घडलेल्या महत्त्वाच्या घटना, करार, पुरस्कार, योजना या घटकांचा अभ्यासक्रमातील इतिहास, भूगोल, राज्यपद्धती, आर्थिक व सामाजिक विकास व पर्यावरण या विषयांशी सांगड घालून प्रश्न विचारण्याकडे कल दिसतो.
त्यामुळे या घटकांची तयारी करीत असताना विद्यार्थ्यांनी एखादी घटना, पुरस्कार याचा विचार कोण? कधी? या स्वरूपात न करता त्या विशिष्ट प्रश्नासंदर्भात दहा मुद्दय़ांची माहिती मिळविणे महत्त्वाचे ठरते. उदा. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन या घटकाचा विचार करताना निव्वळ हे कितवे साहित्य संमेलन होते? कुठे पार पडले? अध्यक्ष कोण होते?
हेच न पाहता संमेलनासंबंधी इतरही माहिती असणे आवश्यक ठरते. उदा. उद्घाटक, स्वागताध्यक्ष, आतापर्यंत किती महिला अध्यक्षा झाल्या? विवादास्पद साहित्य संमेलने कधी झाली होती? कोकणात झालेले कितवे साहित्य संमेलन होते? या अंगाने साहित्य संमेलनाचा विचार व्हायला हवा. चालू घडामोडीची तयारी ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. साधारणत: एका वर्षांची वृत्तपत्रे, लोकराज्य (मासिक), आर्थिक पाहणी अहवाल, योजना (मासिक), बाजारात उपलब्ध असलेले एखादे चालू घडामोडी विषयक पुस्तक, सिव्हिल सव्र्हिस क्रोनिकल, दूरदर्शनवरील बातम्या, लोकसभारा ज्यसभा या वाहिन्यांवरील चर्चा ऐकणे अशा पद्धतीने या घटकाच्या तयारीवर भर देणे गरजेचे ठरते. (क्रमश:)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा