परीक्षा जवळ आली की मानसिक दडपण वाढू लागते, त्यात आपण वर्षभर फक्त स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करत असाल तर हे दडपण जास्त वाढते. अनेकदा परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आपणास काहीच आठवत नाही अशी स्थिती होते. हे आपल्याच बाबतीत घडते असे नाही, तर ते सर्वाच्या बाबतीत घडत असते अशा वेळी निराश न होता सकारात्मक दृष्टीने परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलली गेली आहे, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. स्पर्धा प्रचंड जीवघेणी आहे. त्यामुळे अभ्यासाची गती पूर्वी जी होती तशीच ठेवणे आवश्यक आहे. अभ्यास जर बऱ्यापकी झाला असेल तर वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो. मात्र परीक्षेच्या दिवशी प्रश्न पाहून आपण गोंधळात असतो. ऐनवेळी हा गोंधळ न होण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे.
परीक्षेला जाण्यापूर्वी : परीक्षेच्या आदल्या दिवशी जागरण करू नये. काही विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रभर जागरण करतात, मला कळत नाही, जो अभ्यास एक वर्षांत पूर्ण झाला नाही तो अभ्यास शेवटच्या दिवशी कसा पूर्ण होईल? पेपरच्या दिवशी आपण ताजेतवाने असणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी अर्धा तास पोहचावे.
परीक्षा हॉलमध्ये शिरल्यानंतर परीक्षकांच्या सूचनांचे पालन करावे. पेपर हातात मिळाल्यानंतर सर्वप्रथम आपला क्रमांक सुवाच्य अक्षरात लिहावा, त्यात चूक करू नये. पूर्वपरीक्षेत काळ्या शाईच्या बॉलपेनने तो क्रमांक नमूद करावयाचा असतो, त्यात चूक  झाली तर ती दुरुस्त करणे जवळजवळ अशक्य असते, म्हणून क्रमांक व्यवस्थित नमूद करावा.
पेपर हातात पडल्यानंतर पहिली काही मिनिटे फार महत्त्वाची असतात. सुरुवातीचे सोपे आल्यास अगदीच हुरळून न जाता व सुरुवातीचे प्रश्न अवघड आल्यास अगदीच निराश न होता, शांत मनाने एक एक प्रश्न अचूक सोडविण्याचा  प्रयत्न करावा. पेपर 1 सोडविताना वेळेची फारशी अडचण येत नाही. मात्र पेपर 2 सोडविताना वेळेकडे काटेकोर लक्ष ठेवावे, एखादा प्रश्न अवघड वाटत असेल तर विनाकारण त्यासाठी वेळ न देता पुढच्या प्रश्नाकडे वळावे. उत्तर लिहिताना उत्तरपत्रिकेच्या त्याच क्रमांकावर काळ्या शाईच्या पेनने गोल केला किंवा नाही ते पाहून घ्यावे, काही वेळा उत्तरावर खूण करताना चुकीच्या क्रमांकावर केल्यास त्याच्या पुढील सर्व उत्तरांचा क्रम चुकण्याची शक्यता असते. पेपर 2 मध्ये प्रथम उताऱ्यावरचे प्रश्न सोडवावेत की गणिती पद्धतींवरील प्रश्न सोडवावेत हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मला वाटते याचे उत्तर विद्यार्थीगणिक बदलू शकते, मी म्हणेन, ज्यांनी गणिती प्रश्न किंवा बुद्धिमत्तेवरील प्रश्न यांचा सराव जास्त केला असेल, ज्यांना या प्रश्नात गती असेल त्यांनी सर्वप्रथम कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त या प्रकारची उदाहरणे अचूक सोडविण्याचा प्रयत्न करावा व नंतरच उताऱ्यावरील प्रश्नांकडे जावे, सर्वच्या सर्व उतारे सोडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण असे केल्यास वेळ जास्त लागण्याची शक्यता आहे, म्हणून सोपे उतारे लवकरात लवकर सोडवावीत, मात्र ज्यांची गणिती उदाहरणात वा बुद्धिमत्तेवरील उदाहरणात गती नसेल त्यांनी उताऱ्यावरील प्रश्न अचूक सोडविण्याचा प्रयत्न करावा व नंतर बुद्धिमत्तेवरील जे प्रश्न कमीत कमी वेळेत सोडविता येतील ते प्रश्न सोडवावेत, परीक्षेपूर्वी साधारणत: चार ते पाच प्रश्नपत्रिका वेळेत सोडवून पाहण्याचा प्रयत्न करावा म्हणजे काही महत्त्वाच्या चुका टाळता येतील.
‘स्पर्धा परीक्षा गुरू’ या सदराचा शेवट करताना एवढेच सांगावेसे वाटते की, कोणत्याही प्रसंगी न डगमगता, निराश न होता प्रयत्न करीत राहा. भव्यदिव्य स्वप्नांचा पाठलाग करताना अग्निदिव्यातून जावेच लागते किंबहुना आयुष्यच तुमच्याकडून तशी मागणी करते, मोठी संकटे सुंदर असतात, कारण ते तुमच्यातले जे चांगले आहे, सर्वोत्तम आहे त्याला यामुळे आव्हान मिळते. खरेतर अशा कसोटीच्या क्षणातच तुमच्यातले खरे गुण सुवर्णाकित होतात, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करावयाचे असतील तर तुम्हाला जिंकायलाच हवे!
एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी. परीक्षेची तयारी करणा-या महाराष्ट्रातील माझ्या मित्रांना परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा…!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा