‘सदा सत्य वदुनी धर्माचरावे,’ असा संस्कारांचा पाठ आपल्या गीतातून देणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता आपल्याच प्राध्यापकांची व अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली आहे. विद्यापीठाच्या सामाईक ई-मेलवरून होणाऱ्या संदेशांची छाननी करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली असून यावरून प्राध्यापकांत तीव्र नाराजी आहे.
विद्यापीठाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी यांच्यामध्ये संदेशाची देवाणघेवाण करण्याकरिताallusers@mu.ac.in  हा सामाईक ई-मेल पत्ता सर्वाना दिला गेला आहे. शिक्षकांना इतर शिक्षकांशी काही शैक्षणिक बाबींवर चर्चा करायची असल्यास किंवा अधिकाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांना काही संदेश द्यावयाचा असल्यास या ई-मेलचा वापर केला जातो. काही शिक्षकांनी बुधवारी दुपारी या ई-मेलवरून संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ‘फेल्युअर’ची सूचना मिळाली. यासंदर्भात ‘विद्यापीठ संगणकीय केंद्रा’कडे शिक्षकांनी विचारणा केली असता, ‘यापुढे आपले ई-मेल केंद्राच्या ‘हेल्प डेस्क’वर तपासून पाहिल्यानंतरच संबंधित व्यक्तीकडे पाठविले जातील,’ असे उत्तर मिळाले.
हा संपूर्ण प्रकार ‘सेन्सॉरशिप’चा असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.  अर्थशास्त्र विभागाचे प्रा. नीरज हातेकर यांच्या निलंबनामुळे विद्यापीठातील विद्यार्थी-प्राध्यापकांमध्ये प्रक्षोभ उसळला. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासन ताकही फुंकून पीत आहे. त्यातूनच या प्रकारची पोलीसगिरी करण्याचे, सेन्सॉरशीप लादण्याचे प्रकार प्रशासनाला सुचले आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया एका प्राध्यापकाने व्यक्त केली.
या संदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.नरेशचंद्र यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोला’ असे उत्तर दिले. तर कुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बनसोड यांनी ही सेवा सुरू असल्याचा खुलासा केला. मात्र, ‘सेन्सॉरशिप’बद्दल आपण अनभिज्ञ असल्याचे म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा