विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे अर्ज भरणे, निकाल जाहीर करणे आदी मुंबई विद्यापीठाची कामे ऑनलाइन करणाऱ्या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमकेसीएल) पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गोंधळी व अरेरावी कारभाराबद्दल अधिसभा सदस्यांनीच शुक्रवारी एका बैठकीत धारेवर धरले.
एमकेसीएलच्या कारभाराबद्दल विद्यापीठ प्रशासन, प्राचार्य, विद्यार्थी अशा सर्वच स्तरावर सार्वत्रिक नाराजी व्यक्त होते आहे. युवा सेना आणि मनविसे या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी तर या विषयावरून अधिसभा बैठकीपूर्वीच्या चहापानावरच बहिष्कार टाकला होता. या नाराजीनाटय़ानंतर प्र-कुलगुरू, परीक्षा नियंत्रक आदींच्या उपस्थितीत अधिसभा सदस्य आणि एमकेसीएलचे काही पदाधिकारी यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात युवा सेनेचे प्रदीप सावंत, सुप्रिया कारंडे, संजय वैराळ, मनविसेचे गणेश चव्हाण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय शेटय़े आदी सदस्यांनी हजेरी लावली. त्यात एमकेसीएलच्या मनमानीवर अधिसभा सदस्यांनी टीकास्त्र सोडले.

Story img Loader